लोकसभा निवडणुकीनिमित्त उडालेल्या प्रचाराच्या धुरळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही ‘मोदी एके मोदी’ हा एकच विषय मांडण्यात येत असल्याने स्थानिक प्रश्न पूर्णपणे बाजूला पडल्याचे दिसून येत आहे. महायुतीकडून मोदी यांचा पाठिंब्यासाठी तर आघाडीकडून टिकेसाठी वापर करण्यात येत आहे.
अलिकडेच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात झालेला पाऊस, गारपीट, त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान हा विषय गाजला. ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीमुळे उमेदवारांना प्रारंभीचे काही दिवस प्रचार करणेही मुश्किल झाले होते. प्रचाराचे स्वरूप केवळ नुकसानग्रस्तांची भेट घेणे एवढय़ावरच मर्यादित राहिले होते. निवडणुकीचा प्रचार रंगात आल्यावर सर्वच नेते आपल्या सभांमध्ये हा प्रचाराचा मुद्दा करतील असे वाटत होते. परंतु प्रचार सभांमधूनही या मुद्याला कोणी स्पर्श करताना दिसत नाही. याशिवाय पंचनाम्यानंतरही शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात होत असलेली दिरंगाई, जिल्ह्यातील कांदा प्रश्न, टंचाईची स्थिती, वाढती गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय शाळांकडून शुल्क व इतर सर्वच बाबतीत होत असलेली मुजोरी असे प्रश्न स्थानिक जनतेला भेडसावत असताना आणि या सर्व प्रश्नांचा संबंध केंद्र व राज्य यांच्याशी असल्यामुळे ते लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे होऊ शकत असतानाही हे विषय कोणाही उमेदवारास विशेष गांभिर्याचे वाटले नाहीत.
महायुतीकडून होत असलेल्या प्रचारात मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कसे योग्य आहेत यावरच अधिक भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे. दुसरीकडे आघाडीकडूनही प्रचाराचा धडाका उडाला असला तरी मोदी हे पंतप्रधानपदासाठी कसे अयोग्य आहेत हा विषय त्यांच्याकडून मांडला जात आहे.
मोदी यांच्यावर टीका करण्यातच त्यांचे नेते भर देत आहेत. त्यामुळेच इतर सर्व विषय बाजूला पडून फक्त मोदी हा एकच विषय प्रचाराचा मुद्दा झाला आहे.