लॉजच्या वेटरने पैसे चोरले असल्याच्या संशयावरून पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराच्या खोलीतून पोलिसांना तीन लाखांची रोकड आणि ९०० ग्रॅम सोन्याची बिस्किटे असा ३० लाखांचा बेहिशेबी माल सापडला असून, या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी या तक्रारदाराला अटक करण्यात आली होती. फिरोज खान असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये अनेक दिवसांपासून खान राहत होता. मंगळवारी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या खान याने लॉजमधील वेटरशी पैसे चोरल्याचा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद एपीएमसी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. हा वाद मिटविण्यासाठी पोलिसांनी खान राहत असलेल्या खोलीची झडती घेतली. यात ९ सोन्याची बिस्किटे, तीन लाखांची रोकड आणि सिंगापूर येथील चलन असा ३० लाखांचा माल आढळून आला. तसेच त्याच्या जवळील पासपोर्टवरून तो दर आठवडय़ाला सिंगापूरला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली आहे.