स्थळ : वाशीतील साहित्य संस्कृती कला मंडळाचे सभागृह,
वेळ : संध्याकाळचे साडेसहा ते रात्री साडेआठची
दृश्य : सभागृह भरगच्च भरलेले, बाहेर संततधार कोसळणारा पाऊस, त्यामुळे ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा’ या बडबडगीतांची सूत्रसंचालकाने करून दिलेली आठवण, त्याच वेळी हे गुंतवणूक मार्गदर्शन ऐकल्यानंतर पैसा खोटा होणार नाही तर मोठा होईल याची दिलेली खात्री, गुंतवणूक कधी, कशी, कुठे, केव्हा, का करावी यासारख्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी अनेकांचे आतुरलेले कान, या मार्गदर्शन मेळाव्यामागची लोकसत्ताचे वरिष्ठ साहाय्यक संपादक रवि आमले यांनी प्रस्तावनेतून स्पष्ट केलेली भूमिका, प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात पिंगा घालणाऱ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देण्याचा सीए जयंत गोखले, शेअर बाजारावर सातत्याने स्तंभलेखन करणारे अजय वाळिंबे, सिबिलसारख्या अपरिचित कार्यप्रणालीचे अनेक कंगोरे उलगडून दाखविणाऱ्या हर्षला चांदोरकर यांनी केलेला प्रयत्न, त्यानंतर तब्बल दोन तास आपल्यालाही भविष्यासाठी काही तरी गुंतवणूक करायची हा मनाशी निश्चय करून बसलेले गुंतवणूकदार, माझ्या निवृत्तीला आता केवळ दोन वर्षे शिल्लक राहिली आहेत, मी कुठे गुंतवणूक करू, कर्ज घेतलेले नाही तरीही सिबिल रिपोर्ट मिळू शकतो का, फसवणूक केलेल्या बडय़ा कंपन्यांना त्यांचा सिबिल रिपोर्ट खराब असताना कर्जे कशी दिली जातात, सिबिलचा स्कोर जास्त असताना कर्जसवलत का मिळत नाही, कोणत्या वयाच्या टप्प्यावर गुंतवणूक करायला हवी, गृहिणींना शेअरमध्ये गुंतवणूक करता येऊ शकले का, पतीच्या नावे असलेले शेअर पत्नीच्या नावावर वळते करता येऊ शकतात का या सारख्या अनेक प्रश्नांची उकल शोधणाऱ्या गुंतवणूकदारांना या मेळाव्यामुळे मदतच झाली. या प्रश्नांची उत्तरे गोखले, वाळिंबे, चांदोरकर यांनी मोठय़ा खुबीने दिली.
निवृत्तीकडे झुकलेल्या गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम आपल्या मेडिक्लेमला महत्त्व द्यावे, त्यानंतर किसान विकास पत्र, बँकेतील सुरक्षित ठेवी, त्यानंतर डेथ फंड्स आणि या सर्व गुंतवणुकीतून शिल्लक राहिलेली रक्कम ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही, पण ही गुंतवणूक केवळ छंद म्हणून करावी. त्यासाठी त्याचा बारकाईने अभ्यास करणे मात्र आवश्यक आहे. कर्ज घेतले नाही तरी सिबिल रिपोर्ट घेणे कधीही चांगले, तो कर्ज लवकर मिळवून देण्यास हातभार लावणारा ठरेल. तुम्ही कर्जच घेतले नसेल तर तुमचा सिबिल रिपोर्ट तपासणी करण्याचा प्रश्न येत नाही. सिबिल कंपनीवर कर्ज, क्रेडिट कार्ड रेकॉर्ड देण्याची जबाबदारी आहे. ग्राहकाला कर्ज देणे अथवा नाकारणे याचा सर्वस्वी निर्णय बँक व्यवस्थापन घेत असते. त्यामुळे एखाद्याचा सिबिल स्कोअर कमी असला तरी बँका त्यांना कर्ज देऊ शकते. जास्त स्कोअर असणारे ग्राहक बँकांबरोबर व्याजदर कमी करण्यासाठी चर्चा करू शकतात. आपल्या वयाचा विचार करून गुंतवणूक करावी, तिशीत असलेले तरुण प्रथम गुंतवणूक जोरात करतात पण नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने ही गुंतवणूक कमी होते. त्यानंतर या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर वयाच्या ५०शीनंतर पुन्हा शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे ही मंडळी वळत असल्याचे दिसून आले आहे. महिन्याला हजार-दीड हजार रुपये बचत करू शकणाऱ्या महिलादेखील घरबसल्या शेअरचा अभ्यास करून शेअर गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर रोखीत शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे सध्या पेव फुटले असून त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. शेअर बाजारात सल्लागार आपली फी त्यांच्या अभ्यासानुसार लावत असतात. प्रश्न अनेक आणि वेळ कमी म्हणून गुंतवणूकदारांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लोकसत्ताच्या अर्थब्रह्ममध्ये देण्याचे आश्वासन लोकसत्ताचे प्रतिनिधी व कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालक करणारे रोहन टिल्लू यांना द्यावे लागेल.