भाषण चांगले होण्यासाठी काय तयारी करायची, वाचन आवश्यक आहे का, उत्स्फूर्त भाषण करताना नेमके कोणते मुद्दे कसे मांडावेत, ध्वनिक्षेपकासमोर बोलताना आवाजात चढउतार कसे ठेवावेत, भाषण करताना हातांचे काय करायचे, असे अनेक प्रश्न स्पर्धक वक्त्यांकडून येत होते आणि या तरुण वक्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या वक्त्यांकडून या प्रश्नांची उत्तरे विविध अंगांनी मिळत होती. निमित्त होते उद्याचे वक्ते घडवण्यासाठी लोकसत्ताने घेतलेल्या कार्यशाळेचे! नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्वमिा महामंडळ यांच्या सहकार्याने आयोजित लोकसत्ता वक्तृत्त्व स्पध्रेच्या महाअंतिम फेरीतील नऊ उत्कृष्ट वक्त्यांना या कार्यशाळेत वक्तृत्त्वाचे विविध पलू शिकायला मिळाले.
या कार्यशाळेच्या सुरुवातीला वक्त्या, निवेदिका आणि सूत्रसंचालिका धनश्री लेले यांनी विषयाची तयारी कशी करावी याबाबत या सर्व वक्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या विषयाची मांडणी करताना सुरुवातीलाच लेले यांनी दासबोधातील एका ओवीचा दाखला देत वक्ता कसा असावा आणि वक्त्याने काय विचार करायला हवा याबाबत काही मुद्दे सांगितले. भाषणासाठीचा विषय निवडणे, वाचन, भाषणाचे लेखन, मुद्दे काढणे, सारांश काढणे, इतर वक्त्यांची भाषणे चालू असताना त्यातील मुद्दे टिपून घेणे, अशा विविध क्लृप्त्या त्यांनी सांगितल्या.
दुसऱ्या सत्रात अभिनेता आणि कवी किशोर कदम यांनी संवादकौशल्य आणि आवाजातील चढउतार यांच्यासाठी आवश्यक असे काही महत्त्वाचे व्यायाम सांगितले. भाषण करताना उगाच भावनांनी ओथंबलेले भाषण करण्याऐवजी साधे, सोपे आणि लोकांना पटेल, असे बोलणे आवश्यक आहे, हे त्यांनी पटवून दिले. उत्तम बोलण्यासाठी स्वत:चा सूर सापडणे आणि कळणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी गायनाचे थोडे अंग असायला हवे, अशी टीपही त्यांनी दिली.
तर पुढील सत्रात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी विषयाचे सादरीकरण, वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धामध्ये भाषण करताना घ्यायची काळजी याबाबत स्पर्धकांना विविध मुद्दे सांगितले. आपल्या महाविद्यालयीन आयुष्यातील स्पर्धाचे अनुभव सांगत त्यांनी स्पर्धामध्ये काय काय करायला हवे, हे सांगितले. महाविद्यालयीन पातळीवर तब्बल २१ स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करताना विषयाची माहिती मिळवण्यासाठी केलेले
खटाटोप, वाचनाचे अंग आदी गोष्टी त्यांनी स्पर्धकांसमोर मांडल्या.
राज्यातील आठ विभागांतून आलेल्या स्पर्धकांनीही विविध प्रश्न विचारत आपली जिज्ञासा पूर्ण केली. यात विषयाची निवड कशी करायची, संदर्भ किती द्यायचे, भाषण लिहून काढायचे की नाही, भाषण करताना हातांचे काय करायचे, आदी विविध प्रश्न विचारले गेले. सर्वच वक्त्यांनी या प्रत्येक प्रश्नाला अगदी मनापासून उत्तरे देत या स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

इथेच आम्ही जिंकलो
आजपर्यंत अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. मात्र लोकसत्ताने आयोजित केलेली ही राज्यस्तरीय स्पर्धा आमच्यासाठी प्रचंड भव्य आहे. ही कार्यशाळा म्हणजे या स्पध्रेचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. चंद्रकांत कुलकर्णी, किशोर कदम आणि धनश्री लेले यांच्यासारख्या दिग्गजांनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आम्हाला मार्गदर्शन केले, इथेच आम्ही जिंकलो आहोत.
– आकांक्षा चिंचोलकर (औरंगाबाद)

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?

संवाद महत्त्वाचा वाटला
स्पर्धा झाल्यानंतर परीक्षक आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात. मात्र ते एकतर्फी असते. म्हणजे आमच्या प्रश्नांना, आमच्या मनातील शंकांना काहीच उत्तरे मिळत नाहीत. मात्र लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यशाळेत आम्हाला आमच्या मनातील प्रश्न विचारता आले. विशेष म्हणजे या सर्व प्रश्नांची उत्तरे तेवढय़ाच मान्यवर वक्त्यांकडून मिळाली.
– कविता देवढे (अहमदनगर विभाग)

वक्तृत्वाचे सखोल ज्ञान मिळाले
देशातील तरुण पिढी अनेक ज्वलंत विषयांवर काय विचार करते, हे या स्पध्रेच्या माध्यमातून राज्यभरात पोहोचवले आहे. या कार्यशाळेत विषयाची निवड कशी करावी, शब्दशैली कशी असावी, भाषणात आवाजाची लेव्हल कुठपर्यंत असावी, या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. या कार्यशाळेत शिकलेल्या गोष्टी आम्हाला भावी आयुष्यातही उपयोगी पडणार आहेत.
– शुभांगी ओक (नागपूर विभाग)

नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या
कार्यशाळेत सहभागी होणे, हा खूपच जबरदस्त अनुभव होता. महाराष्ट्रातील ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ शोधण्यासाठी ही कार्यशाळा खूपच महत्त्वाची होती. कसं बोलायला हवं, आवाजातील चढउतार, भाषण कसं हवं या गोष्टी शिकायला मिळाल्या.
– रसिका चिंचोळे (नागपूर विभाग)

एक पायरी वर गेलो
आम्ही केलेल्या इतर स्पर्धामध्ये भाषण ऐकल्यानंतर आमचे कौतुक व्हायचे. प्रतिक्रिया चांगल्याच मिळायच्या. पण लोकसत्ताच्या या कार्यशाळेमुळे आम्ही खूप काही शिकलो आहोत. ही स्पर्धा करण्याआधी आम्ही जिथे होतो, त्यापेक्षा समृद्ध होऊन एक पायरी वर गेलो आहोत. स्पध्रेच्या निमित्ताने खूप वाचन झाले, चांगला अभ्यास झाला. ही शिदोरी आम्ही पुढे नेणार आहोत.
– रिद्धी म्हात्रे (ठाणे विभाग)

दृष्टिकोन बदलला
या कार्यशाळेमध्ये वक्ता घडवण्याचे काम नक्कीच चांगल्या पद्धतीने झाले आहे. वक्ता कोण, हे आम्हाला या कार्यशाळेने शिकवले. या कार्यशाळेत इतर स्पर्धकांसह संवाद साधतानाही मजा आली. आमचा दृष्टिकोन नक्कीच बदलला. या कार्यशाळेमुळे वक्तृत्वाबद्दल पुन्हा एकदा नव्याने विचार करावासा वाटला. बोलणे आणि बोलता येणे यातील फरक कळला.
– काजल बोरस्ते (नाशिक विभाग)

जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने उमगल्या
उत्तम वक्ता हा उत्तम कलाकार असावा लागतो, सूर सापडण्यासाठी गाण्याचे अंग असावे लागते, या अनेक गोष्टी या कार्यशाळेतून कळल्या. काही जुन्याच गोष्टी नव्याने कळल्या. दणदणाट करण्यापेक्षा माणसांत राहून माणसासारखे बोलणे महत्त्वाचे असते, हे नव्याने कळले.
– आदित्य कुलकर्णी (रत्नागिरी विभाग)

वक्तृत्वाला ग्लॅमर मिळाले
या कार्यशाळेमधून खूप शिकायला मिळाले. नाटक, गाणी, नृत्ये या तीन गोष्टींना महाविद्यालयीन आयुष्यात सध्या खूप महत्त्व मिळाले आहे. मात्र वक्तृत्वाकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र आता लोकसत्ताच्या या स्पध्रेमुळे वक्तृत्वाला चांगलेच ग्लॅमर मिळाले आहे. ही कला पुन्हा नव्याने लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचली.
– श्रेयस मेहेंदळे (मुंबई विभाग)

खूप मूलभूत गोष्टी कळल्या
या कार्यशाळेत आम्हाला आतापर्यंत कोणीच न सांगितलेल्या वक्तृत्वाबद्दलच्या अनेक मूलभूत गोष्टी कळल्या. भाषण करताना विचार महत्त्वाचा, तो विचार मांडताना तो तुम्हाला पटलेला असणे महत्त्वाचे, या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या.
– नेहा देसाई (पुणे विभाग)