भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील अनेक दिग्गज गायक आणि वादक यांना एकाच व्यासपीठावर ऐकण्याची सुवर्णसंधी ‘लोकसत्ता स्वरांजली-२०१३’ च्या निमित्ताने संगीत रसिकांना मिळणार आहे. ‘लोकसत्ता स्वरांजली-२०१३’ या संगीत मैफिलीचे आयोजन  ३ ते ५ जानेवारी २०१३ रोजी वरळी येथील नेहरू सेंटर येथे संध्याकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ‘लोकसत्ता’ प्रायोजक आहे.
 ‘लोकसत्ता स्वरांजली-२०१३’ या सांगीतिक मैफिलीच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अद्वितीय कामगिरीने आपले वेगळे वैशिष्टय़ निर्माण केलेले प्रख्यात गायक पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी. आर. व्यास यांना तसेच भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या नामवंत गायक आणि वादकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.   ‘लोकसत्ता स्वरांजली-२०१३’ च्या पहिल्या दिवशी म्हणजे ३ जानेवारी रोजी प्रख्यात गायिका मालिनी राजूरकर यांच्या गायनाने या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. राजूरकर यांच्या गायनानंतर रसिकांना ख्यातनाम संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या  वादनाचा आनंद घेता येणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ रंगणार आहे ती पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले तालवादक पंडित विक्कूविनायकराम, सेल्वा गणेश, तौफिक कुरेशी आणि आदित्य कल्याणपूर यांच्या जुगलबंदी रसिकांसमोर पेश होईल. ‘लोकसत्ता स्वरांजली-२०१३’ च्या अंतिम दिवशी म्हणजे ५ जानेवारी २०१३ रोजी नामवंत शास्त्रीय गायिका मीता पंडित यांचे गायन होईल. त्यानंतर नामवंत आणि ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनाने या सांगीतिक मैफिलीची सांगता होईल.  ‘लोकसत्ता स्वरांजली-२०१३’ या मैफिलीचे आयोजन अमित कारेकर यांच्या ‘स्वरप्रभा’ या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रांमधील दिग्गजांना एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमाला बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बिर्ला व्हाइट सिमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, एअर इंडिया आणि आयटीसी ग्रँड सेंट्रल यांनी प्रायोजकत्व दिले आहे.