वाचन, मनन, चिंतन व अनुभवांचा मेळ घालत विदर्भातील ‘निवडक २०’ महाविद्यालयीन वक्त्यांनी लोकसत्ता वक्तृत्व स्पध्रेची नागपूर विभागीय स्पर्धा गाजविली. अमरावती मार्गावरील सवरेदय आश्रमात ही विभागीय फेरी पार पडली.
‘नाथे समूह’ प्रस्तुत व ‘पृथ्वी एडिफाईस’च्या सहकार्याने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून भारतीय आयुर्विमा महामंडळ, जनकल्याण बॅंक व तन्वी हर्बल यांचे सहकार्य स्पर्धेला लाभले आहे. महापालिकेचे सत्ता पक्षनेता दयाशंकर तिवारी व नाथे ग्रुप ऑफ पब्लिकेशनचे प्रबंध संचालक संजय नाथे यांच्या हस्ते स्पध्रेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पध्रेचे परीक्षक अभय टिळक, आशुतोष अडोणी व अजेय गंपावार, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील नायर, लोकसत्ताचे नागपूर ब्युरो चिफ देवेंद्र गावंडे, वितरण उपमहाव्यवस्थापक वीरेन रानडे, टीम रेडचे महाव्यवस्थापक बी.के.ख्वाजा व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पध्रेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना दयाशंकर तिवारी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत स्पर्धकांना वक्तृत्वासंबंधी मार्गदर्शन केले. उत्कृष्ट वक्तृत्वाचे सामाजिक जीवनातील महत्व त्यांनी विविध उदाहरणे देत अधोरेखित केले. आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांचा मनाचा ठाव घेतला पाहिजे व असे वक्तृत्व घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असा सल्ला दिला. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांंचे वाचन कमी होत चालल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. वक्तृत्व स्पर्धांची संख्या रोडावत चालली असताना लोकसत्ताची स्पर्धा हा अभिनंदनीय उपक्रम असल्याचे ते म्हणाले. संजय नाथे यांनी आपल्या भाषणात, जगभरातील कर्तृत्ववान नेत्यांचे दाखले देत विद्यार्थ्यांना वक्तृत्वात सुधारणा करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
ओबामा आले, पुढे काय?, जाहिराती आम्हाला का आवडतात?, संवादमाध्यमे आणि आम्ही, मराठी अभिजात झाली, मग काय? व पुराणातील वानगी पुराणात या पाच विषयांवर वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रत्येक स्पर्धकाला बोलण्याकरिता दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. स्पर्धकांव्यतिरिक्त पालक, विद्यार्थी, प्राध्यापक व वक्तृत्वप्रेमी नागरिक या स्पध्रेकरिता उपस्थित होते.
परीक्षकांच्या प्रतिक्रिया
अभय टिळक – तरुण मुले आपापल्या परीने विचार करतात व ते विचार मांडण्याचा उत्साह व उत्सुकता खूप आहे. विविध पैलूंचे आपल्या जीवनाशी असलेले नाते ही मुले तपासून बघतात व आजूबाजूच्या बदलांशी आपले आयुष्य जोडू बघताहेत. ते त्यांच्या बोलण्यातून डोकावत आहे व त्यातून त्यांची संवेदनशीलता दिसते. सध्या संपूर्ण जग संवादावर अवलंबून आहे व त्यामुळे आपले विचार सूत्रबध्द पध्दतीने मांडता येणे हे एकूणच धारणेच्या दृष्टीने आवश्यक आहे. चांगल्या प्रकारे व्यक्त होणे हा व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे व या स्पध्रेमुळे विविध पाश्र्वभूमीच्या विद्यार्थ्यांना ही संधी या स्पध्रेमुळे मिळत आहे. स्पर्धकांच्या क्षमता वृध्दिंगत होण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत उपकारक आहे.
आशुतोष अडोणी- आजच्या पिढीसमोरचे सर्वात मोठे आव्हान विचारशून्यतेचे आहे. त्या पाश्र्वभूमीवर लोकसत्तेची स्पर्धा तरुणांना विचार करायला लावते आहे, हा महत्वाचा भाग आहे. वक्तृत्वाचा प्राण विचार आहे. मला जे वाटते ते मांडण्यासाठी मला आधी विचार करावा लागतो. ते शास्त्र आहे व कलाही आहे. ज्या देशाच्या संसदीय लोकशाहीचा आधार वक्तृत्व आहे, त्या देशात विचार करणारे, संवेदनशील वक्ते तयार होणे महत्वाचे आहे. या आयोजनासाठी लोकसत्ता अभिनंदनास पात्र आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असला तरी अजून मार्गदर्शनाची गरज आहे.
अजेय गंपावार- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वक्तृत्वाकडे वळवण्याचे काम या स्पध्रेने होते आहे. स्पध्रेचे विषय चांगले असून विद्यार्थ्यांना सर्व बाजूंनी विचार करायला वाव मिळणार आहे. विषयाचे अजून आकलन करणे, चौफेर मांडणी करणे व विषयाला आणखी भिडणे स्पर्धकांकडून अपेक्षित होते. पाठांतरीपलीकडे जाऊन स्पर्धकांनी बोलावयास हवे, पण ही घडत जाण्याची प्रक्रिया आहे. इतर स्पर्धकांना ऐकण्याची, त्यांच्याकडून काही शिकण्याची संधी या स्पध्रेमुळे मिळते आहे. नेटके व उत्तम आयोजन हा स्पध्रेचा महत्वाचा भाग आहे.