विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहातील श्रोते मंत्रमुग्ध होऊन या वक्त्यांची भाषणे ऐकत होते. लोकसत्ताच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी मुंबईत मोठय़ा दिमाखात पार पडली. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला पार्लेकरच नाही, तर सर्वच मुंबईतील प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला जनकल्याण सहकारी बँक आणि तन्वी हर्बल्स यांचेही मोलाचे साहाय्य लाभले आहे. या स्पध्रेतील क्षणचित्रांसह वक्त्यांनी मांडलेल्या विषयांची एक झलक..
आपच्या विजयाचे वेगळेपण
दिल्लीत अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना मुंबईत लोकसत्ताच्या रत्नागिरी विभागातून महाअंतिम फेरीत दाखल झालेल्या आणि उत्तेजनार्थ पारितोषिक विजेता चिपळूणच्या ‘डीबीजे’ महाविद्यालयाचा आदित्य कुलकर्णी या स्पर्धकाने ‘आपच्या विजयाचे वेगळेपण’ हा विषय मांडत श्रोत्यांच्या मनातील भावनांनाही वाचा फोडली. याच घटनेचा संदर्भ देत त्याने आपले भाषण सुरू केले. आपचा विजय म्हणजे अंतिम लढाई यशस्वी होणे नव्हे, हा मुद्दा त्याने सर्वप्रथम मांडला. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे परिणाम महाराष्ट्रातल्या राजकारणावरही होणार आहेत, असे सांगत त्याने या विषयाचा परामर्श घेतला. केजरीवाल यांचे नेतृत्व, प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री होणार आदी सर्वच गोष्टींचा आढावा त्याने आपल्या भाषणात घेतला. ‘आप’ला मिळालेली सामान्य माणसाची साथ, भाषणबाजी न करता मूलभूत प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत केलेला प्रचार आदी गोष्टींवरही त्याने प्रकाश टाकला.
सोशल मीडिया : अभिव्यक्तीचा बहर की कहर?
नागपूर विभागातून महाअंतिम फेरीमध्ये दाखल झालेली आणि द्वितीय पारितोषिक विजेती अमरावतीच्या ‘केशरबाई लाहोटी’ महाविद्यालयाची शुभांगी ओक हिने ‘सोशल मीडिया : अभिव्यक्तीचा बहर की कहर?’ हा विषय मांडला. सध्या तरुणाईला सोशल मीडिया या विषयाबाबत प्रचंड आकर्षण आणि जिव्हाळा आहे. अशा वेळी तरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शुभांगी हिने हा विषय मांडताना गुहेमध्ये राहणाऱ्या माणसापासून बंगल्यात राहणाऱ्या माणसापर्यंतचा मानवजातीचा प्रवास, त्यात होणारे बदल, माध्यमांमधील बदल आदी गोष्टींचा परामर्श घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून बहर नाहीच, पण कहर खूप दिसतो, असे मत तिने मांडले. आपण बोलतोय, ती गोष्ट समोरच्यापर्यंत नीट पोहोचते का, सांगणाऱ्याला आपण काय सांगतोय हेदेखील कळत नसते, आदी गोष्टींवर तिने प्रकाश टाकला. सोशल मीडियावर चालणारा संवाद अतिरिक्त संवाद होतो आणि तो समाजासाठी घातक असतो, असे मत तिने मांडले.

महाराष्ट्राच्या भावी वक्त्यांच्या भाषणांना प्रेक्षकांची दाद
‘आजची तरुण पिढी दिशाहीन असून तिला तिची ठाम मते नाहीत,’ अशी ओरड सतत ऐकायला मिळते. पण हे मत खोडून टाकण्याची संधी महाराष्ट्रभरच्या तरुणाईला ‘लोकसत्ता’च्या ‘वक्तृत्व स्पर्धे’ने दिली होती. या संधीचा पुरेपूर फायदा करून घेत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या नऊ स्पर्धकांनी केवळ आपली मते परखडपणे मांडलीच नाहीत, तर त्यासाठी प्रेक्षकांची दादही घेतली. धर्म.. राँग नंबर? लिव्ह इन रिलेशनशिप, नेमाडे-रश्दी वाद, नेतृत्वपण, सोशल मीडिया, शिक्षण, स्त्रीमुक्ती अशा विविध विषयांवर स्पर्धकांनी आपली स्पष्ट मते परीक्षक आणि प्रेक्षकांसमोर मांडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती. सभागृह गच्च भरलेले असल्यामुळे कित्येकांना आत येण्याची संधी मिळाली नाही, त्यांनी बाहेर ताटकळत उभे राहून शांतपणे
वक्त्यांची भाषणे ऐकण्यास पसंती दिली होती. असे असूनही ज्या क्षणी स्पर्धकांच्या भाषणाला सुरुवात झाली, तेव्हा सभागृहामध्ये नीरव शांतता पसरली होती. मोबाइलचा आवाज किंवा चुळबुळीने स्पर्धकाचे मन विचलित होऊ नये, याची प्रेक्षकांनी पुरेपूर काळजी घेतली. नेहा देसाई हिने वापरलेल्या शाब्दिक कोटय़ा असोत किंवा रिद्धी म्हात्रे हिचे लग्नाविषयक स्पष्टोच्चार. स्पर्धकांनी वेळोवेळी त्यांच्या शाब्दिक कौशल्याने प्रेक्षकांची मनमुराद दाद मिळवली होती. अर्थात सर्वच स्पर्धकांनी वेळोवेळी त्यांचा मुद्दा मांडण्यासाठी दिलेली उदाहरणे, काव्यपंक्ती यांना प्रेक्षक दाद देत होते. सरतेशेवटी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहासाची पाने उलगडून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

नेतृत्व आणि मराठीपण
पुणे विभागातून महाअंतिम फेरीत आलेल्या आणि वक्ता दशसहस्र्ोषु आणि प्रा. वसंत कुंभोजकर विशेष पारितोषिकाची मानकरी ठरलेल्या नेहा देसाई (आयएलएस विधी महाविद्यालय, पुणे) हिने ‘नेतृत्व आणि मराठीपण’ या विषयावर बोलताना सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय नेतृत्व या सर्वच पैलूंवर प्रकाश टाकला. मराठीपण म्हणजे नेमके काय, या मुद्दय़ापासून तिने आपल्या भाषणाची सुरुवात केली. भाषा आणि प्रखर राष्ट्रवाद ही मराठीपणाची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीत भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक जाणिवांचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने ‘नेतृत्व आणि मराठीपण’ या दोन शब्दांची सांगड महत्त्वाची ठरते. एखादी गोष्ट स्वीकारताना सांगोपांग विचार करणे, परखड चिकित्सा करणे आणि त्यानंतर तो विचार स्वीकारल्यावर त्याचा प्रचार करण्यासाठी जीव ओतून काम करणे, ही मराठीपणाची लक्षणे आहेत, हे तिने स्पष्ट केले. तसेच आपल्या भाषणातून मराठीपण बदलण्यासाठी काय काय करायला हवे, यावरही तिने भर दिला.
बॉलीवूड हे हॉलीवूड का नाही?
नाशिक विभागातील ‘एचपीटी’ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि तृतीय पारितोषिक विजेती काजल बोरस्ते हिने ‘बॉलीवूड हे हॉलीवूड का नाही?’ या विषयावर आपली मते मांडली. बॉलीवूड ही सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. पण हॉलीवूडमधील प्रगल्भता, झोकून देण्याची वृत्ती, तंत्रज्ञान आदी गोष्टी बॉलीवूडमध्ये नाहीत, याकडेही तिने लक्ष वेधले. बॉलीवूड आणि हॉलीवूड हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे आहेत, हा मुद्दा तिने मांडला. हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये वैचारिक बैठक असते; मात्र ही बैठक बॉलीवूडमध्ये कमी दिसून येत असल्याचेही तिने नमूद केले.