समाजातील प्रत्येक घडामोडींच्या इत्यंभूत विश्लेषणाबरोबर सामाजिक भान जपत ‘यशस्वी भव’ सारख्या शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या ‘लोकसत्ता’चे योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे विद्यार्थ्यांनीदेखील लोकसत्ताच्या प्रत्येक शैक्षणिक लेखाचे नुसते वाचनच नव्हे, तर संकलन करून अभ्यास करावा व या अनमोल शिदोरीची जपणूक करावी, असे मार्गदर्शन खासदार एकनाथ गायकवाड यांनी सायन येथे केले.
शिक्षक साधना मंडळाच्या सायन येथील साधना विद्यालयात लोकसत्ता ‘यशस्वी भव’च्या दहावीच्या विद्यार्थ्यांंसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी खासदार एकनाथ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेचे मानद सचिव चंद्रकांत खोपडे, खजिनदार चैतन्य पाटील, विश्वस्त कीर्तिताई ठाकरे, मुख्याध्यापिका अंजली कुसुरकर यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासोबत उद्योजक राजू गोडस, हुकूमराज मेहता व लोकसत्ताचे प्रतिनिधी शेखर जोशी यांनीही आपले विचार मांडले. यावेळी शिक्षिका सुप्रिया अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व बीजगणित या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता हणमघर यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता. गायकवाड यांच्या हस्ते लोकसत्ताच्या यशस्वी भव पुस्तकाचे वितरण यावेळी करण्यात आले.  एकनाथ गायकवाड यांच्या वतीने हा उपक्रम धारावी येथील गणेश विद्यामंदिर येथेही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मधुसूदन कळंबे, सचिव चंद्रकांत कदम, मुख्याध्यापिका जोजन यांच्यासह लोकसत्ताचे वितरण अधिकारी मंगेश ठाकूर व अली अकबर रोनक हे देखील उपस्थित होते. महिला व बाल कल्याण मंत्री वर्षां गायकवाड यांच्या वतीने ‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रम धारावी, सायन येथील सात शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन राजू गोडसे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.