अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नगर शाखेच्या अध्यक्षपदी पुन्हा सतीश लोटके यांची निवड करण्यात आली. प्रमुख कार्यवाहपदी प्रसाद बेडेकर व कोषाध्यक्षपदी अमोल खोले यांची निवड करण्यात आली.
संस्थेच्या कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या सभेत एकमताने या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर बोलताना नगर शाखेच्या व्यापक कार्याला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. मध्यवर्ती शाखेचा कार्यकारिणी सदस्य तसेच राज्यातील शाखांचा समन्वयक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाचा फायदा नगर शाखेला होईल असे ते म्हणाले. येत्या दि. १ व २ फेब्रुवारीला पंढरपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनात नगर शाखेच्या वतीने ‘लाइन ऑफ कंट्रोल’ हे बालनाटय़ सादर केले जाणार असल्याची माहिती लोटके यांनी या वेळी दिली. मुख्य रंगमंचावर मान्यवरांसमोर हे सादरीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डेकर यांनी संस्थेच्या भविष्यातील विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या वतीने दर महिन्याला नाटय़कलाकारांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याची सुरुवात या महिन्यातच झाली असे ते म्हणाले. संस्थेच्या भक्कम अर्थकारणासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन खोले यांनी या वेळी दिले.
 निवडीतील ‘चौथा अंक’
नाटय़ परिषदेच्या नगर शाखेच्या कोणत्याही उपक्रमात असतो त्याप्रमाणे या निवडीतही ‘चौथा अंक’ असल्याचे समजते. शाखेचे मावळते अध्यक्ष अनंत जोशी यांना या निवडी तर दूरच राहिल्या, अशी कुठली बैठक झाल्याचेच माहीत नव्हते. ‘लोकसत्ता’कडूनच त्यांना ही माहिती मिळाली. विशेष म्हणजे संस्थेवर तीनच पदाधिकारी निवडण्यात आले असून, तेवढय़ांचीच नावे या प्रसिद्धिपत्रकात आहेत. बैठकीतील अन्य उपस्थितांचीही नावे त्यात नाहीत. नियमाप्रमाणे मुदत संपलेल्या अध्यक्षाला कार्याध्यक्ष म्हणून पुन्हा कार्यकारिणीत सामावून घेतले जाते. तसे या वेळी अद्यापि झालेले नाही.