नव्या वर्षांचे आगळेवेगळे स्वागत करण्याचे मनसुबे जागोजागी रचले जात असतानाच दिल्लीतील त्या दुखद प्रसंगातून फुललेल्या संघर्षांच्या ठिणग्यांनी यंदा नववर्षांच्या पूर्वसंध्येला वेगळाच रंग दिला. नशील्या पार्टीत आणि धुंद रोषणाईत झगमगून ३१ डिसेंबरची अवघी रात्र जागविण्याच्या मुंबईच्या नेहमीच्या स्वप्नांवर या वर्षी मात्र वेदनेचा वळ उमटलेला होता. इमारतींच्या गच्चीवर, तारांकित हॉटेल आणि पब्जमध्ये नव्या वर्षांचे धुंद स्वागत होत असतानाही, तेथे उमटणाऱ्या संगीताच्या सुरात एखादी वेदनेची लकेरही उमटत होती.. त्यामुळे, उत्साहाची धुंदी आणि दुखाची छाया अशा दुहेरी सावटातच मुंबईची वर्षअखेरची रात्र संपली, आणि याच सावटात नववर्षांचा सूर्य उगवला..
मुंबईचा ३१ डिसेंबरचा बाज दर वर्षी काही आगळाच असतो. दुपारपासूनच तमाम तरुणाईचे डोळे सूर्यास्ताकडे लागतात, आणि मरीन ड्राईव्हच्या समुद्रात सूर्याचा सोनेरी गोळा बुडू लागला, की मावळत्या वर्षांच्या त्या अखेरच्या सूर्यास्ताच्या हजारो साक्षीदारांच्या मनात नववर्षांच्या स्वागताचे धुंद सूर घुमू लागतात. संधीप्रकाशात एक उत्साही चित्कार अवकाशभर पसरतो आणि क्षणागणिक चढणाऱ्या रात्रीवर नशीली धुंदी स्वार होऊ लागते. जागोजागी पाटर्य़ा सुरू होतात. मने थिरकावणाऱ्या  संगीताचे सूर सजू लागतात, आणि सारे काही विसरून अवघी तरुणाई नववर्षांच्या पहाटेची नवी स्वप्ने जागवू लागते.. यंदा मात्र, याच तरुणाईने संयमीपणाने नववर्षांच्या स्वागताचा घाट घातला आणि समंजसपणाचे अनोखे दर्शनही घडविले.
मानवतेला काळीमा फासणाऱ्या पाशवी सामूहिक बलात्कारपीडित तरुणीच्या दुर्दैवी निधनाचे दुख मुंबईच्या रात्रीवर दाटलेले जाणवत होते. नववर्षांच्या पूर्वसंध्येस होणाऱ्या पार्टीला पूर्णविराम देऊन त्याऐवजी प्रार्थनासभा पार पडल्या. वर्षांरंभाच्या पहिल्या सूर्योदयासोबत पसरणाऱ्या सोनेरी किरणांतून झिरपणाऱ्या उत्साहाऐवजी, वर्षअखेरच्या मावळत्या सूर्याच्या किरणांची उदास छायाच नंतरच्या रात्रीवर राहिली.. नववर्षांच्या स्वागतासाठी केलेल्या रोषणाईतच, काही पणत्या आणि मेणबत्त्यादेखील संथपणे तेवताना मुंबईने अनुभवल्या. सामूहिक बलात्काराचा बळी ठरलेल्या त्या तरुणीच्या संघर्षांतून पेटलेल्या ठिणग्यांचे अस्तित्वदेखील नववर्षांच्या पूर्वसंध्येला जागोजागी जाणवत राहिले.. विविध धर्मीयांनी आपापल्या प्रार्थनास्थळी या दुदैवी तरुणीसाठी प्रार्थना केल्या.
दिल्लीतील त्या घटनेनंतर मुंबईत पोलिसांनीही सुरक्षा उपायांची कडेकोट आखणी केली होती. नशील्या रात्रीच्या प्रभावाखाली कोणाचाही तोल जाऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास तीस हजार पोलीस कर्मचाऱ्यांची फौज रात्रभर मुंबईच्या रस्तोरस्ती डोळ्यात तेल घालून सज्ज होती. मद्यपान करून सुसाट वेगाने वाहने चालविणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी जागोजागी उभ्या असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच, व्हिडिओ कॅमेऱ्यांचीही सर्वत्र नजर होती. कोणत्याही स्थितीत महिलांच्या सुरक्षिततेला धक्का लागणार नाही, यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सक्त सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या, तर पब्ज, हॉटेल्समधील नशील्या पाटर्य़ामध्ये नववर्षांच्या आनंदाची नशा ‘उतू’ जाणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी तेथील व्यवस्थापनांवरच सोपविण्यात आली होती.. पार्टी संपल्यानंतरदेखील सुरक्षा उपाययोजना शिथिल होणार नाही, याची दक्षता घेण्याचा समंजसपणा आज जागोजागी अनुभवाला येत होता. रात्री उशीरा पार्टी संपवून घरी परतणाऱ्या प्रत्येक वाहनात किमान एक तरी व्यक्ती नशापान न केलेली असावी, यासाठी अनेक पब्ज आणि हॉटेल्सचे सुरक्षा कर्मचारीच स्वतहून खबरदारी घेत होते. नववर्षांच्या पूर्वसंध्येला अंमली पदार्थांच्या व्यापाराला तेजी येत असल्याचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी यंदा विशेष खबरदारी घेतली होती.  खाजगी पाटर्य़ामधील नशापाण्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी अगोदरच अमली पदार्थांच्या व्यापारातील संशयितांवर सक्त नजर ठेवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून काही संशयितांना ताब्यातही घेण्यात आले होते..