शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भातील स्कूलबस धोरणानुसार सेंट जोसेफ स्कूलमधील बुलढाणाच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बसेस नसल्यामुळे व परिवहन विभागाने चारही बसेसवर कारवाई केल्यामुळे चिखलीवरून बुलढाणा ये-जा करणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांचा प्रवास ठप्प झाला आहे. स्वत: पालकांनी मुलांना बुलढाणा येथे शाळेत ने-आण करावी लागत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत.
चिखलीवरून बुलढाणा येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये जवळपास ३०० ते ३५० विद्यार्थी दररोज जाणे-येणे करतात. या चारही बसेसवर आरटीओ कार्यालयाने नियमानुसार कारवाई केल्यामुळे बसेस बंद झाल्याने आता या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांना हेलपाटे पडत आहेत.
२०११ मधील शालेय विद्यार्थी सुरक्षित वाहतूक नियमातील तरतुदीनुसार शालेय मुलांची सुरक्षित ने-आण करणे, परिवहन शुल्क भरणे, बसस्थानके निश्चित करणे, या बाबीकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेने एका परिवहन समितीचे गठण करावयाचे असून, या समितीद्वारे वाहनाची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्रे, योग्यता प्रमाणपत्र, विमा परवाना, वायू प्रदूषण प्रमाणपत्र, वाहनचालक लायसन्स, अग्निशामक, प्रथमोपचार पेटी या बाबी प्रस्तावित केल्या आहेत. समितीचा अध्यक्ष शाळेचे प्राचार्य राहणार असून एक पालक-शिक्षक संघाचा प्रतिनिधी, संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक, बस कंत्राटदारांचा प्रतिनिधी यांचा समावेश करावयाचा असून दर तीन महिन्यांतून एकदा या समितीची बैठक होणे नियमात आहे.
वरील नियमांनुसार शाळकरी मुलांच्या सुरक्षित प्रवास कायद्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, जेणेकरून आज सेंट जोसेफच्या शाळेत मुले ने-आण करणाऱ्या बसेसवर अचानक कारवाई झाल्याने चिखलीच्या ३५० विद्यार्थी व त्यांच्या पाल्यांना त्रास सहन करावा लागत आहे तो यापुढे होणार नाही.