कांद्याची भाववाढ सरसरी शंभरी गाठण्याकडे कूच करीत असल्याचे चित्र निर्माण झालेले असताना कांद्याची वाढलेली आयात, सरकारने चाळ साठवणुकांची घेतलेली झाडाझडती, ग्राहकांनी काटकसरीचा स्वीकारलेला मंत्र, शेजारील राज्य आंध्र प्रदेशाने दिलेला मदतीचा हात यामुळे कांद्याचे भाव घाऊक बाजारात निदान स्थिरावले असून सोमवारी हा कांदा ५० ते ५५ रुपयांनी विकला गेला आहे. आंध्राचा कांदा तर ४० ते ४५ रुपयांनी विकला गेला. रविवारी घाऊक बाजार बंद असतानादेखील केवळ ६० गाडय़ा भरून कांदा बाजारात आलेला आहे. त्यामुळे आवक घटलेली असताना भाव स्थिरावल्याचे चित्र आहे.या वर्षी अवकाळी पावसामुळे कांद्याचे गणित कोलमडून गेले आहे. मागणी आणि पुरवठा यात मोठय़ा प्रमाणात तफावत निर्माण झाल्याने कांदा शंभरी गाठणार का अशी भीती व्यक्त केली जात होती. कांद्याच्या दरवाढीतील चढ-उतारावर अनेक पगारदारांचे वेतन-गणित अवलंबून आहेत. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीला केंद्र तसेत राज्य सरकारे गांर्भीयाने घेत असल्याचे दिसून येते. राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कांद्याने चाळिशी गाठली आणि ही दरवाढ सरसर वाढत जात असल्याचे दिसून येत होते. मागील आठवडय़ात तर ही दरवाढ घाऊक बाजारात ६२ रुपये प्रति किलोने गेल्याने किरकोळ बाजारात हाच कांदा ७० ते ७५ रुपये प्रति किलो झाला. ही दरवाढ अशीच राहिली तर सणासुदीच्या काळात कांद्याच्या शंभरीने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही असे चित्र होते. त्याच वेळी केंद्र सरकाराने इजिप्तहून मोठय़ा प्रमाणात आयात करण्यात दिलेली परवानगी, अफगाणिस्तान, पाकिस्तानी कांद्याने उत्तर भारतातील दरवाढ रोखण्यास केलेली मदत आणि राज्यातील कांद्यासाठी आंध्र प्रदेशातील कांद्याने वाढवलेली आवक यामुळे कांद्याचे भाव स्थिरवण्यास सुरुवात झाली आहे.यात सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की ग्राहकानेही परस्थितीबरोबर समझोता करताना एक किलोऐवजी पाव किलो कांदा खरेदी करणे सुरू केले आहे. कांदा जपून वापरला जात असल्याने खरेदीदार कमी झाले आहेत. नाशिक, नगर, जिल्ह्य़ात कांदा साठवणूक करणाऱ्या चाळचालकांची जिल्हाधिकाऱ्यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या चाळीअडून साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही चाप बसला. त्यामुळे आहे तो कांदा बाजारात येऊ लागला आहे. हीच स्थिती राहिली तर कांदा आणखी दहा-पंधरा रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दर ४० ते ४५ रुपयांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत असून कांदा-बाजाराचे माजी संचालक अशोक वाळुंज यांनी या शक्यतेला दुजोरा दिला.