दोन महिने उलटले तरी नोव्हेंबर, २०१४मध्ये झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने मुंबई विद्यापीठाच्या एमकॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यासाठीचे अर्ज भरण्याची मुदतही उलटून गेली आहे. मात्र, विद्यापीठाने आधीच्याच परीक्षेचा निकाल जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. या गोंधळाची मालिका सुरू झाली ती एमकॉमच्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर. मार्च, २०१४मध्ये या परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाने जाहीर केला. त्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ऑक्टोबर, २०१४मध्ये घेण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुका आल्याने विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलली. अखेर नोव्हेंबर, २०१४मध्ये विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली. मात्र, दोन महिने झाले तरी या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जाहीर केलेला नाही.
महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार जास्तीतजास्त ४५ दिवसांत विद्यापीठाने निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. परंतु, ६० दिवस उलटूनही विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यात यश आलेले नाही. परिणामी विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. काही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत दररोज परीक्षा विभागाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. त्या वेळी आमची कधी दोन तर कधी तीन दिवसांत निकाल जाहीर करू, असे छापाचे उत्तर देऊन बोळवण केली जाते, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. आता तर एप्रिलमध्ये होणाऱ्या फेरपरीक्षेकरिता अर्ज भरण्याची मुदतही आता उलटून गेली आहे. परंतु, आधीच्या परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने आम्ही अर्जच भरलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने दिली.

परीक्षा विभागाचे खुले सत्र
मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा विभागाशी संबंधित शंकांचे निरसन करण्याकरिता ३ मार्चला खुले सत्र आयोजिण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत हे सत्र भरेल. यात प्रभारी कुलगुरू, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता व परीक्षा विभागातील उपकुलसचिव व साहाय्यक कुलसचिव उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या शंकांचे व प्रश्नांचे निरसन करतील.