प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये अत्यावश्यक असलेले ‘एम-इंडिकेटर’चे नवे व्हर्जन १४ जुलैपासून अ‍ॅड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर उपलब्ध होणार आहे. ‘लेडीबग’ या नावाने तयार करण्यात आलेल्या या नव्या व्हर्जनमध्ये पाच नवीन अ‍ॅप्सचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती ‘एम इंडिकेटर’चे संस्थापक सचिन टेके यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
‘एम-इंडिकेटर’च्या नव्या व्हर्जनमध्ये मोनो व मेट्रो रेल्वेचे वेळापत्रक व तिकीट दर, गेट वे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का, मढ, मार्वे येथून सुटणाऱ्या फेरी बोटींचे वेळापत्रक, प्रॉपर्टी आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाच्या काही माहितीचा समावेश करण्यात आला असल्याचे टेके म्हणाले.
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे नकाशा, या प्रवासाचे पहिल्या व दुसऱ्या वर्गाचे तिकीट दर, मासिक आणि त्रमासिक पासाचे दर ही ऑफलाईन माहिती नव्या व्हर्जनमध्ये आहे. तसेच काही टॅक्सी तळांचे (काळी-पिवळी टॅक्सी) दूरध्वनी क्रमांक यासह मुंबईतील समुद्राच्या भरती-ओहोटीच्या वेळा, कोणत्या भागात किती पाऊस पडला, त्या भागाचे तापमान, पुढील सात दिवसातील वेधशाळेचा पावसाचा अंदाज यांचाही समावेश असल्याचे टेके यांनी सांगितले.
सध्या हे नवे व्हर्जन अ‍ॅड्रॉईडवर उपलब्ध असेल. लवकरच विंडोज आणि आयफोनवर ते देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहितीही टेके यांनी दिली. एम-इंडिकेटरच्या नियंत्रण प्रणालीचे मुख्य अधिकारी अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले.