अगदी काही वर्षांपूर्वी ठिकठिकाणच्या गणपती मंदिरांपुरता सीमित असणाऱ्या माघी गणेशोत्सवाने आता भ्राद्रपद उत्सवाप्रमाणे घरगुती आणि सार्वजनिक स्वरूप घेतले असून वर्षांगणिक या उत्सवाचा माहोल वाढत चालल्याचे दिसून येत आहे.श्रीगणेश हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. या दैवताचा जनमानसावर असणारा प्रभाव लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांनी भ्राद्रपद महिन्यातील गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप देऊन त्याचा उपयोग समाजजागृती, प्रबोधन तसेच राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागण्यासाठी केला. स्वातंत्र्यानंतर तर या उत्सवाचे स्वरूप केवळ कायमच राहिले नाही, तर भारतातील सर्वात मोठय़ा उत्सवांमध्ये याची गणना होऊ लागली. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या कैकपट वाढत गेली. गेल्या काही वर्षांत मात्र आतापर्यंत सर्वसाधारणपणे मंदिरांपुरता मर्यादित असणारा माघी गणेशोत्सवही घरगुती तसेच सार्वजनिक स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. विशेषत: ठाणे परिसरात लक्षात येण्याइतपत या उत्सवाचे प्रस्थ वाढले आहे.

* दोन्ही तिथींना सारखेच महत्त्व
 भाद्रपद महिन्यात पाऊस असल्याने अनेकदा सार्वजनिकरीत्या उत्सव साजरा करणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे काही मंडळे हल्ली माघ महिन्यात उत्सव साजरे करू लागले आहेत. गणेशाची एकूण २४ रूपे आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा शिव-पार्वतीचा पुत्र गजाननाचा तर माघ महिन्यात येणारी चतुर्थी हा आदिती तसेच कश्यप मुनी या दाम्पत्याचा पुत्र विनायकाचा जन्मदिवस. या दोन्ही तिथींना आपल्याकडे सारखेच महत्त्व आहे, असा निर्वाळा ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिला.  
* १०७ सार्वजनिक, ५२६ घरगुती
ठाणे परिसरात यंदा १०७ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्याचप्रमाणे ५२६ घरगुती गणेशोत्सवांची नोंद झाली आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरांत या उत्सवानिमित्त निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. बदलापूरमध्ये तर या उत्सवानिमित्त रेल्वे स्थानक परिसरात जत्राच भरते. एवढेच नव्हे तर माघी उत्सव हे बदलापूर शहराचे महत्त्वाचे असे सांस्कृतिक वैशिष्टय़ ठरले आहे.
* मूर्तीचीही मागणी वाढली
पूर्वी माघी उत्सव केवळ मंदिरांमध्येच होत असल्याने साहजिकच गणेश मूर्तीना फारशी मागणी नव्हती. उत्सवाच्या निमित्ताने मंदिरांची रंगरंगोटी आणि डागडुजी केली जाते. त्याच वेळी परिसरातील कलावंतांकडून मंदिरांमधील गणेश मूर्तीचेही नव्याने रंगकाम केले जाते. गेल्या काही वर्षांत मात्र माघी उत्सवासाठी मूर्तीची मागणी वाढू लागली आहे. भाद्रपद महिन्यातील उत्सवासाठी पेणमधील कारखान्यांमधून लाखो मूर्ती तयार होतात. त्या जोडीने आता माघ महिन्यातही मूर्तीची मागणी वाढू लागली आहे. यंदा पेण परिसरातून सुमारे एक हजारहून अधिक गणेश मूर्ती माघी उत्सवासाठी पाठविण्यात आल्याची माहिती हमरापूर येथील मूर्तिकार संजय यादव यांनी दिली. अंबरनाथमधील मूर्तिकार नाना कडू म्हणतात- ‘पाच वर्षांपूर्वी माघी उत्सवासाठी माझ्याकडे फक्त एक मूर्ती असायची, यंदा मी दहा मूर्ती केल्या.’