सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, मोठा गाजावाजा करत हाती घेण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची मुदत खुद्द पालिका प्रशासनाने आता एप्रिल २०१५ पर्यंत वाढवून घेतली आहे. मध्यंतरी गंगापूररोडसह काही भागात पालिकेने धडकपणे ही मोहीम राबविली. त्यानंतर नागरिकांना काही काळ अतिक्रमणे काढण्यास मुदत देऊन अनधिकृत बांधकामांवर लाल निशाण मारले. दरम्यानच्या काळात काही भयग्रस्त अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. पालिका व अतिक्रमणधारकांनी स्वत:हून काढलेल्या अनधिकृत बांधकामांची संख्या १६५० हून अधिकवर पोहोचली आहे. या माध्यमातून शहर मोकळा श्वास घेईल अशी अपेक्षा असताना नव्याची नवलाईप्रमाणे प्रमाणे राहिलेल्या मोहिमेतील पालिकेचा उत्साह मावळल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ३० टक्के अतिक्रमणे हटविली गेली असून एप्रिलपर्यंत उर्वरित ७० टक्के अतिक्रमणे निष्काषीत केली जातील अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, लाखो भाविक शहरात दाखल होणार आहेत. वाहनतळाचा अभाव, जागोजागी उभी राहिलेली अनधिकृत बांधकामे व दुकाने यामुळे त्याचा विपरित परिणाम अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीवर होत आहे. बहुतांश व्यापारी संकुलात वाहनतळ नसल्याने नागरीक रस्त्यावर वाहने उभी करून खरेदीचा आनंद घेतात. परिणामी, रस्त्यांच्या दोन्ही बाजुचा परिसर वाहनतळात रुपांतरीत झाला आहे. त्याची परिणती वाहतूक कोंडीत होत असल्याने ही बाब सिंहस्थात डोकेदुखी ठरणार असल्याचे स्पष्ट आहे.
याच पाश्र्वभूमीवर, पालिकेने दीड महिन्यांपूर्वी मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याचे निश्चित केले होते. गंगापूर रस्त्यावरून त्याचा दिमाखदारपणे शुभारंभ झाला. हॉटेल्स, बँका, बडे व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी अशी सर्वाची अतिक्रमणे भुईसपाट केली गेली. या मोहिमेने सर्वदूर चांगला संदेश पोहोचला. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता अतिक्रमणे हटविली जातील अशी सर्वाची धारणा झाली. सलग काही दिवस अव्याहतपणे मोहीम सुरू झाल्यामुळे अतिक्रमणधारकांनी धसका घेत अतिक्रमणे काढून घेण्याची तयारी दर्शविली. यामुळे पालिकेने काही दिवसांचा अवधी संबंधितांना दिला. या काळात अनेकांनी अतिक्रमणे काढून घेत पालिकेने काम सुसह्य केले.
गंगापूर रोडप्रमाणे शहरातील अन्य भागातील रस्ते या मोहिमेने मोकळा श्वास घेऊ लागतील, अशी आशा निर्माण झाली. दरम्यानच्या काळात पालिकेने शहरातील काना-कोपऱ्यातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमित बांधकामे अधोरेखीत करण्याची मोहीम हाती घेतली. लाल निशाण मारून अतिक्रमण दर्शविण्यात आले. जेणेकरून नागरिकांनी स्वत:हून ती काढून घ्यावी असे पालिकेला अभिप्रेत आहे. हे निशाण मारलेली अतिक्रमणे कोणत्याही क्षणी हटविली जातील, असा इशाराही देण्यात आला. तथापि, हे इशारे देऊन बराच काळ लोटल्यानंतर उर्वरित अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने ही तत्परता न दाखवता मोहिमेचा कालावधी वाढवून घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी देखील ही बाब सूचित केली. शहरातील ३० टक्के अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. अद्याप ७० टक्के अतिक्रमणे काढण्याचे काम बाकी आहे. एप्रिल २०१५ पर्यंत ही सर्व अतिक्रमणे काढली जातील, असे त्यांनी सूचित केले. थांबलेली ही मोहीम लवकर सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मध्यंतरी १५ दिवस पालिकेने या मोहिमेला का विश्रांती दिली ही बाब मात्र स्पष्ट झाली नाही.