नवी मुंबईतून कल्याण-डोंबिवलीकडे जाणाऱ्या वाहनांना अंत्यत सोयीस्कर ठरणारा महापे-शीळफाटा मार्गावर महापे येथील उड्डाण पूल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी वाहतुकीस खुला करण्यात आला. पूल बांधून दोन महिन्यापेक्षा जास्त काळ पूर्ण होऊनही तो वाहतुकीस खुला केला जात नसल्याने उद्योजकांत नाराजी व्यक्त केली जात होती. महामुंबई वृत्तान्तमध्ये या संदर्भात वाचा फोडण्यात आली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळेची वाट न पाहता पालकमंत्री शिंदे यांनी या पुलाचे शुक्रवारी लोकार्पण केले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने हा उड्डाण पूल बांधण्यात आला आहे.
नवी मुंबई औद्योगिक पट्टय़ात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हा ११०० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात शीळफाटामार्गे कल्याण-डोंबिवली, मुंब्रा, या भागात जाणाऱ्या वाहनचालकांना या भागात बराच त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात हा पूल एमएमआरडीएने बांधावा अशी गळ तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी घातली होती. त्यानुसार चव्हाण यांनी हा पूल बांधण्याचा आदेश एमएमआरडीएला दिले होते. त्यानुसार ७१ कोटी रुपये खर्च करून हा सुमारे एक किलोमीटरपेक्षा जास्त पूल उभारण्यात आला आहे. यामुळे आता या पुलावरून नवी मुंबईकडे ये-जा करणारी वाहने सुसाट ठाणे-बेलापूर मार्गावर येऊ शकतील तर कल्याण-डोबिंवलीकडे जाणारी वाहने त्याचप्रमाणे जाऊ शकणार आहेत. त्यामुळे या पुलाच्या खालून एमआयडीसीत होणारी अंतर्गत वाहतूक सुरुळीत होणार आहे. एमएमआरडीएने ठाणे-बेलापूर मार्गावरही अशाच दोन उड्डाण पुलांचे काम हाती घेतले असून कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले आहेत. या पुलांवरही १५३ कोटी रुपये खर्च होणार आहे.