भारतात दहा वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या इतर प्राणीसंग्रहालयाने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करीत त्यांच्या प्राणीसंग्रहालयांना नवा आयाम दिला. मात्र, नागपुरातील १२० वषार्ंपासून प्रस्थापित पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयांतर्गत येणाऱ्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची अवस्था आजही ‘जैसे थे’ आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए)ने दिलेली मान्यता येत्या ३० एप्रिलला संपुष्टात येत आहे. त्यामुळे सीझेडएची मान्यता पुढेही कायम राहावी म्हणून प्रशासनाची धडपड सुरू झाली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापित महाराजबाग प्राणीसंग्रहालय इंग्रजांची देण आहे. १८९४ मध्ये स्थापित या प्राणीसंग्रहालयाकडे आजही नागरिकांचा तेवढाच ओढा आहे. गेल्या दहा वर्षांत या प्राणीसंग्रहालयाने सात लाख रुपयावरून एक कोटी रुपयाच्या वर उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे. तरीही या प्राणीसंग्रहालयाची अवस्था सुधारण्यास तयार नाही. दरम्यानच्या काळात गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचा मुद्दा समोर आल्यानंतर महाराजबाग प्राणीसंग्रहालयाकडे अधिकच दुर्लक्ष झाले. सीझेडएने वारंवार दुरुस्तीचे निर्देश दिले, पण त्याकडेही साफ दुर्लक्ष करण्यात आले. प्राणीसंग्रहालयाच्या या दुरावस्थेसाठी महाराजबाग प्रशासन आणि वन विभाग दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या प्रयत्नात आहेत. वन विभागाने त्यांच्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मधील आजारी वन्यप्राणी महाराजबागेत आणून ठेवले आणि महाराजबाग प्रशासनानेही प्राणीसंग्रहालयाकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ते ठेवून घेतले. मात्र, आता गोरेवाडाचा मुद्दा समोर आल्यानंतर वन विभाग त्यांच्या वन्यप्राण्यांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही आणि महाराजबाग प्रशासनदेखील वन विभागाची ‘प्रॉपर्टी’ म्हणून त्यांची म्हणावी तशी दखल घेण्यास तयार नाही. सीझेडएच्या नियमात न बसणाऱ्या गंजलेल्या पिंजऱ्यातच या वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या खानपानाव्यतिरिक्त इतर बाबींकडे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे.
तीन वर्षांपूर्वी जानेवारी २०११ मध्ये सीझेडएची दोन सदस्यीय चमू महाराजबाग प्राणीसंगहालयाच्या निरीक्षणासाठी येऊन गेली. त्यावेळी या चमूने प्राणीसंग्रहालयाच्या दुरावस्थेवर प्रचंड ताशेरे ओढले. त्यानंतर महाराजबाग प्रशासनाने भोपाळच्या एका संस्थेला मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी नियुक्त केले. मात्र, दोनदा सीझेडएने हा प्लॅन त्रुटीअभावी परत पाठवला. त्यानंतर दरम्यानच्या काळात सीझेडएचे सदस्य सचिव बी.एस. बोनल यांनीही प्राणीसंग्रहालयाला अचानक भेट दिली आणि प्राणीसंग्रहालयाच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरले. आता सीझेडएने राज्यातील आठ प्राणीसंग्रहालयांना मास्टर प्लॅनसाठी विचारणा केली आहे, त्यात महाराजबागेचाही समावेश आहे. त्यामुळे ३० एप्रिलनंतर या प्राणीसंग्रहालयाचे भविष्य काय राहणार हे सध्यातरी कळायला मार्ग नाही. दरम्यान, यासंदर्भात महाराजबाग प्राणीसंग्रहालयाचे नियंत्रक व कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता वीरेंद्र गोंगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्राणीसंग्रहालयाची अवस्था नेहमीच अधांतरी राहिलेली आहे. अशाच काही अडचणींअभावी पुण्यातील सारसबागेतील प्राणीसंग्रहालय कात्रजला मोठय़ा प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले. तर मुंबईतल्या राणीच्या बागेतील प्राणीसंग्रहालय अशाच एका प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेत अडकले. औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयाची अवस्थासुद्धा काहीशी अशीच राहिली.
महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील वाघ, बिबट आणि पक्षी यांच्यासाठीच केवळ कुलरची व्यवस्था करण्यात आली असून, इतर प्राण्यांकडे मात्र प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. आजमितीस प्राणीसंग्रहालयात नऊ कुलर असून ते मोठय़ा प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ लावण्यात आले आहेत. इतर प्राण्यांच्या पिंजऱ्यावर मात्र झाडांची सावली आणि हिरवळीचे पडदे पांघरण्यात आले आहेत.