विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले बंडखोर आणि अपक्षांच्या माघारीसाठी शर्थीने प्रयत्न झाल्यामुळे जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत एकूण ९१ उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे आता या जागांसाठी १७३ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक पश्चिममध्ये काहींनी माघार घेतली असली तरी शिवसेनेसमोर बंडखोरीचे संकट कायम आहे. देवळालीची जागा रिपाइं (आठवले) गटाची असल्याने भाजपने आपल्या उमेदवारास अर्ज मागे घेण्यास सांगितले. परंतु त्याने अर्ज मागे न घेतल्याने भाजप कोंडीत अडकला. नांदगाव मतदारसंघात सर्वाधिक १४ जणांनी, तर मालेगाव बाह्यमध्ये सर्वात कमी म्हणजे एका उमेदवाराने माघार घेतली
माघारीची मुदत बुधवारी संपुष्टात आल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्याने बहुतेकांना उमेदवारीची संधी प्राप्त झाली. तथापि, तिकीट न मिळाल्याने बंडाचा झेंडा फडकविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बंडोबांना शांत करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. ज्या मतदारसंघात प्रबळ असे काही उमेदवार होते, त्यांच्या माघारीसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून मनधरणी करण्यात आली. बुधवार हा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयास जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. बंडखोरी शमविण्यात काही ठिकाणी यश मिळाले असले तरी काही जागांवर मात्र ते संकट कायम राहिले आहे.
नांदगाव मतदारसंघात १४, मालेगाव मध्य ५, मालेगाव बाह्य १, बागलाण ७, कळवण १, चांदवड ७, येवला ४, सिन्नर १, निफाड ३, दिंडोरी ५, नाशिक पूर्व ८, नाशिक मध्य ४, नाशिक पश्चिम १०, देवळाली १३, इगतपुरी मतदारसंघात ८ उमेदवारांनी माघार घेतली. जिल्ह्यात माघार घेणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या ९१ आहे. बंडखोर व अपक्षांचे अनेक मतदारसंघांत उदंड पीक आले. नाशिक पश्चिममधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शिवसेनेचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी फडकाविलेले बंडाचे निशाण कायम राहिले. या मतदारसंघात सेनेचे मामा ठाकरे व भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी माघार घेतली. यामुळे भाजपच्या उमेदवारासमोरील संकट दूर झाले असले तरी सेनेची डोकेदुखी कायम राहिली. भाजप व रिपाइंच्या जागा वाटपात देवळालीची जागा रिपाइंला मिळाली आहे. या ठिकाणी रिपाइंचे प्रकाश लोंढे यांची उमेदवारी आहे. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या रामदास सदाफुले यांना ऐनवेळी अधिकृत पत्र देऊन अर्ज भरण्यास सांगितले होते. अंतिम क्षणी सदाफुले यांना माघार घेण्यास सांगण्यात आले. परंतु त्यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने भाजपची अडचण झाली. या मतदारसंघात भाजप व रिपाइंचे उमेदवार आता एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. बंडखोर व प्रबळ अपक्षांमुळे मत विभागणी टाळण्याचा प्रत्येक पक्षाने प्रयत्न केला. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरांची समजूत काढण्यात आली. विविध प्रलोभने दाखवून अपक्षांना उमेदवारी माघारीसाठी राजी केले गेल्याची चर्चा आहे. माघारीची मुदत संपूनही काही बंडोबा शांत न झाल्यामुळे राजकीय पक्षांसमोरील डोकेदुखी कायम राहिली आहे.

माघारीचे ‘खैरे नाटय़’
नाशिक मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विनायक खैरे यांनी माघार घ्यावी, यासाठी काँग्रेसचे उमेदवार शाहू खैरे यांनी बरेच प्रयत्न केले. या विषयावरून दिवसभर गुऱ्हाळ सुरू राहिले. अखेर माघारीसाठी विनायक खैरे राजी झाले, तेव्हा शाहू त्यांना घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले, परंतु माघारीची वेळ निघून गेल्याचे सांगण्यात आल्यावर त्यांचे काहीसे वादविवादही झडले. आघाडीत ताटातूट झाल्यामुळे सर्वच ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार परस्परांसमोर आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसने शाहू, तर राष्ट्रवादीने विनायक खैरे यांना उमेदवारी दिली आहे. परस्परांचे नातेवाईक असणाऱ्या विनायक खैरे यांनी माघार घ्यावी म्हणून शाहू यांनी बरेच प्रयत्न केले. या मुद्दय़ावर संबंधितांमध्ये बरीच चर्चा झाली. दरम्यानच्या काळात त्यांचे प्राबल्य असणाऱ्या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेरीस शाहू व विनायक खैरे हे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षेत जाणार तेवढय़ात विनायक खैरे यांचा भ्रमणध्वनी खणाणला आणि ते कार्यकर्त्यांसह काही कामानिमित्त बाहेर पडले. तासभर ते आवारात भ्रमंती करत होते. दुसऱ्या गटाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ‘संपर्क कक्षेच्या बाहेरच’ राहिले. दरम्यानच्या काळात त्यांनी माघार घेऊ नये म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले. तीन वाजण्यास दोन ते तीन मिनिटे कालावधी असताना ते शाहू खैरे यांच्या समवेत माघारीचा अर्ज देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले. तोवर माघार घेण्याची वेळ संपुष्टात आली होती. यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी शाहू खैरे यांचे वादही झाले. नय्या खैरे यांनी जाणीवपूर्वक ही खेळी केल्याचा आरोप शाहू खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मतदारसंघनिहाय अंतिम चित्र
विधानसभा निवडणुकीसाठी माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत १७३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात नांदगाव मतदारसंघात १५, मालेगाव मध्य १२, मालेगाव बाह्य १०, बागलाण ११, कळवण ७, चांदवड ११, येवला १३, सिन्नर ८, निफाड ७, दिंडोरी १०, नाशिक पूर्व १५, नाशिक मध्य १३, नाशिक पश्चिम ११, देवळाली १८, इगतपुरी १२ या उमेदवारांचा समावेश आहे.