सिडको वसाहतींमध्ये हक्काचे घर विकत घेणे हे सामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. किमान सहा हजार चौरस फुटाने येथे सदनिका विक्री होते. नवीन पनवेल शहरातील शिवा कॉम्प्लेक्स परिसरात महावितरण कंपनीच्या गोदामात कोणीही या किती वर्षेही राहा अशी स्थिती आहे. २२ वर्षांपासून महावितरण कंपनीच्या गोदामात एक कुटुंब बिनभाडय़ाने राहत असून फुकटची वीज वापरत आहे. कोणीही विचारायला नाही म्हणून येथे आता काही मजुरांची राहण्याची सोय केल्याचे येथे राहणारे महावितरण कर्मचारी सांगतात.
शिवा कॉम्प्लेक्स येथे जुने एसटी स्टॅण्ड सिडकोने उभारले आहे. नवीन पनवेलकरांच्या दुर्भाग्यामुळे या स्टॅण्डपासून रेल्वेस्थानक जोडणारी आणि सायन-पनवेल महामार्ग जोडणारी बससेवा कधीच सुरू झाली नाही. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत मुलांनी या स्टॅण्डचा उपयोग खेळण्यासाठी केला आहे. या ओसाड स्टॅण्डला लागूनच महावितरण कंपनीचे गोदाम आहे. या गोदामाच्या शेजारील जागेवर सोलवीन यांनी त्याचे कुटुंब वसविले आहे.
सोलवीन यांच्या घरात एका सदनिकेत जेवढय़ा सुखसोयी असतात त्या सर्व महावितरणच्या आशीर्वादाने गोदामालगत बांधलेल्या बिनभाडय़ाच्या घरात आहे. विशेष म्हणजे वीज कंपनीच्या बिनभाडय़ाच्या घरात राहणारे हे कुटुंब गेल्या २२ वर्षांपासून वीज बिल न भरता राहत आहे. सामान्य वीज ग्राहकांनी एका महिन्याचे बिल भरले नाही तर कंपनी ग्राहकाला सूचना न देता वीज जोडणी तोडते. मात्र महावितरण कंपनीच्या या हितचिंतकांसाठी मात्र कंपनीने नियम बासनात बांधले आहेत. संबंधित कुटुंबातील व्यक्ती महावितरणचे कंत्राटदार असल्याने त्यांना ही जागा मोफत देण्यात आल्याचे महावितरणचे कर्मचारी सांगतात. वेळेवर कंपनीला मजूर मिळत नसल्याने अचानक उद्भवणाऱ्या कामांमुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही शक्कल लढविल्याचे सांगण्यात येते.

महावितरण अधिकाऱ्यांचे कानावर हात
याबाबत या परिसराचे कनिष्ठ अभियंता चामले यांना विचारले असता ते म्हणाले, की सेक्टर आठची जबाबदारी माझी आहे. संबंधित गोदामाची जबाबदारी कनिष्ठ अभियंता शशीकुमार यांच्यावर आहे. त्यानंतर शशीकुमार यांना विचारले असता ते म्हणाले, की आपल्याकडे सेक्टर १२ची जबाबदारी आहे. संबंधित गोदामालगतच्या बेकायदा घर आणि त्यामधील बेकायदा वीज जोडणीचा परिसर हा अधिकार कनिष्ठ अभियंता चामले यांच्या कार्यकक्षेत येतो. त्यामुळे त्यावर तेच उत्तर देतील. महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांच्या या हद्दीवादानंतर पनवेलचे महावितरणचे कार्यकारी अभियंता दिलीप मेहेत्रे यांच्याशी संपर्क साधला असता मेहेत्रे म्हणाले की, नवीन पनवेल येथील गोदामात कुटुंब राहत असल्याबाबत लवकरच माहिती घेतो. बेकायदा वास्तव्य आढळल्यास त्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.