शहर व परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शहरात उच्चदाब वाहिन्यांचे ६३, तर लघुदाब वाहिन्यांचे ७६ असे एकूण १३९ वीज खांब जमीनदोस्त झाले. तसेच साडेतीन किलोमीटरच्या वाहिन्यांचे नुकसान झाले. एक विद्युत रोहित्र वादळाने उखडून टाकले, तर तीन नादुरुस्त झाले. या दुरुस्तीसाठी काहीसा वेळ लागणार असल्याने शहरातील अनेक भाग रात्रभर अंधारात बुडाले. काही भागांत १८ ते २० तासांच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे बुधवारी सकाळी वीजपुरवठा सुरळीत झाला.
मान्सूनचे आगमन होण्याआधीच महावितरण कंपनीकडून तयारी केली जाते. यंदा मान्सूनच्या पूर्वतयारीची कामे प्रगतिपथावर असतानाच मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा बसला. साधारणत: पाऊण तास चाललेल्या पावसाने शहरात शेकडो झाडे व त्यांच्या फांद्या कोसळल्या. त्यात महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेची मोठी हानी झाली. झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले. वीज तारा तुटल्या. परिणामी, शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर महावितरणने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले, परंतु नुकसान इतके मोठे होते की त्याची दुरुस्ती तातडीने होणे अवघड होते. नाशिक शहरातील मध्यवस्तीतील भाग, गंगापूर रोड, नाशिकरोड, पंचवटी, त्र्यंबक रोड, सातपूर या भागांत मोठे नुकसान झाले. त्या तुलनेत नाशिकरोड व देवळाली कॅम्प भागात नुकसानीचे प्रमाण काहीसे कमी होते. वादळी पावसाने वीज वितरणाची व्यवस्था कोलमडली.
नाशिक शहर (१) मध्ये उच्चदाब वाहिन्यांचे ११, तर शहर (२) मध्ये ५२ असे एकूण ६३ वीज खांब कोसळले वा वाकले गेले. वादळी पावसात लघुदाब वाहिन्यांच्या वीज खांबांचाही निभाव लागला नाही. नाशिक शहर एकमध्ये २१, तर शहर दोनमध्ये ५५ असे एकूण ७६ खांब जमीनदोस्त झाले. वीज खांबांचे हे नुकसान पावणे दहा लाख रुपयांचे आहे. अनेक वाहिन्यांवर झाडे कोसळली. त्यात १.९ किलोमीटरच्या उच्चदाब वाहिन्यांचे, तर १.६३ किलोमीटर अंतराच्या लघुदाब वाहिन्यांचे नुकसान झाले. हे नुकसान ३२ हजार रुपयांचे असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. शहरात एका भागात विद्युत रोहित्र कोसळून २५ हजारांचे, तर तीन रोहित्र नादुरुस्त झाल्यामुळे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. शहरातील वेगवेगळ्या भागांत या घटना घडल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला. या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी सुमारे पावणे चार लाख रुपये खर्च येणार आहे. वीज खांब व वाहिन्या पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शक्य तितक्या लवकर ही व्यवस्था उभी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
वादळी पावसाच्या तडाख्याने ही व्यवस्था कोलमडून पडल्याने महात्मा गांधी रोड, गोळे कॉलनी व मध्यवस्तीतील काही परिसरात तसेच द्वारका भागात मंगळवारी रात्रभर वीजपुरवठा होऊ शकला नाही. वीज नसल्याने उकाडय़ाने नागरिक हैराण झाले होते. १८ तासांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी सकाळी काही भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वीज कंपनीला यश आले.