पावसाळ्यात विजेचे अपघात टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले असले तरी सर्वसामान्यांना सतर्कता बाळगण्याचा सल्ला देणाऱ्या वीज कंपनीने आपल्या स्वत:च्या यंत्रणेची मात्र तशी दक्षता घेतली नसल्याचे उघड झाले आहे. शहरातील रस्त्यांलगत वीज वितरणासाठी उभारलेली काही रोहित्रे दरवाजाअभावी उघडी पडली असून त्यातील तारांचे जंजाळ दृष्टिपथास पडते. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रोहित्रांची उंची अतिशय कमी असल्याने नागरिकांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही धोकादायक बाब आहे. विजेचे अपघात टाळण्यासाठी नागरिकांना सतर्क करणाऱ्या महावितरणने आपल्या यंत्रणेने सर्वसामान्यांच्या जिवाला धोका पोहोचणार नाही याची दक्षता घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
पावसाळ्यात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे अनेकदा विद्युत खांब मोडून पडतात. या कालावधीत विजेचे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याबाबत महावितरणने आवाहन केले आहे. घरगुती उपकरणे, विद्युत मोटारींचा वापर करताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. वीज उपकरणे वापरताना ‘अर्थिग’ तुटलेले असल्यास मान्यताप्राप्त परवानाधारकाकडून ती बसवून घेणे, घरातील वीज तारा खराब असल्यास त्या बदलून घ्याव्यात, वायरला जोड देऊन विजेचा वापर करणे टाळावे, ओले कपडे तारांवर टाकू नये, घरातील स्वीच बोर्ड अथवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी, घरात शॉर्ट सर्किट झाल्यास मुख्य बटण बंद करावे, एखाद्यास विजेचा धक्का बसल्यास त्यास वाळलेल्या लाकडाने दूर करावे व तत्काळ रुग्णालयात न्यावे, विद्युत वाहिनींपासून सुरक्षित अंतर ठेवावे, लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्यांखाली अनधिकृतपणे बांधकाम करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या, पत्रा अथवा लोखंडी ग्रीलला घासणार नाही याची दक्षता घ्यावी, पाळीव प्राणी अथवा जनावरे वीज खांबास बांधू नयेत अशी सूचनाही महावितरणने केली आहे.
पावसाळ्यात वेगवेगळ्या कारणांमुळे विजेचे अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे महावितरणने नागरिकांना सतर्क केले असले तरी या कंपनीच्या वीज वितरण व्यवस्थेची अवस्था फारशी चांगली नसल्याचे लक्षात येते. शहरातील रस्त्यांलगत वीज वितरणासाठी उभारलेली रोहित्रे त्याचे उदाहरण म्हणावे लागेल. उघडय़ा रोहित्रांमुळे अपघातांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. शाळा अथवा निवासी वसाहतीच्या परिसरातील काही रोहित्रांना दरवाजे नसल्याने आतील तारा दृष्टिपथास पडतात. डोंगरे वसतिगृह मैदानाच्या मागील भागात असणाऱ्या शाळा व महाविद्यालयालगतच्या रोहित्राची ही स्थिती आहे. गंगापूर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयासमोरील रोहित्रही त्याच धाटणीचे आहे. या पदपथावरून शालेय विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. उघडे पडलेले हे रोहित्र त्यामुळे धोकादायक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संभाजी चौकातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहालगतचे रोहित्र तसेच सीबीएसकडून महापालिकेकडे जाणाऱ्या शरणपूर रस्त्यावरील रोहित्रावरील दरवाजे गायब झाले आहेत. शहरातील विद्युत रोहित्रांच्या अवस्थेची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी रोहित्रांची अशीच अवस्था आहे. वर्दळीचे रस्ते, निवासी भाग, शाळा व महाविद्यालयालगत असणारी ही रोहित्रे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असूनही त्यावर उपाययोजना करण्याकडे महावितरणने लक्ष दिलेले नाही. शहर व परिसरात वीज अपघातांमुळे यापूर्वी काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी नागरिकांच्या बरोबरीने महावितरणने तितकीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.