महिरावणीसारख्या खेडय़ातून युवा संशोधक व उद्योजक सुनील खांडबहाले यांनी थेट अमेरिकेतील बोस्टन येथील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या विद्यापीठातील व्यवस्थापनविषयक शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ‘स्लोन फेलो इन इनोव्हेशन ग्लोबल लीडरशिप’ असे या एक वर्षांच्या अभ्यासक्रमाचे नाव असून दरवर्षी प्रदीर्घ प्रक्रियेंतर्गत जगभरातील केवळ १२० जणांची त्यासाठी निवड केली जाते.
शेणाने सारवलेली खड्डेवजा जमीन.. गळणारे छप्पर.. एकाच खोलीत दाटीवाटीने बसविलेल्या विद्यार्थ्यांच्या चार रांगा म्हणजे चार वर्ग आणि सर्वाना मिळून सर्व विषय शिकविण्याचा प्रयत्न करणारे एकच शिक्षक.. असे वास्तव असलेल्या इगतपुरी तालुक्यातील वांजोळे या खेडय़ातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या खांडबहाले यांनी संगणक क्षेत्रात केलेली प्रगती थक्क करणारी आहे. अमेरिकेतील व्यवस्थापनविषयक शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड होणे हा त्यापुढील एक टप्पा होय. एक टक्क्याहूनही कमी स्वीकृत असलेल्या अतिशय स्पर्धात्मक अशा या अभ्यासक्रमासाठी फॉच्र्युन ५०० कंपन्यांचे प्रमुख, व्यवस्थापक इच्छुक असतात. खांडबहाले यांची निवड झालेल्या या शिष्यवृत्तीच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये नोबेल पारितोषिकविजेते व राष्ट्रसंघाचे प्रमुख कोफी अन्नान, मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष जॉन डब्ल्यू थॉम्प्सन, फोर्ड मोटर्सचे माजी कार्याध्यक्ष अ‍ॅलन मुली आदी अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
अतिशय खर्चीक असलेल्या या स्लोन एमबीए प्रोग्रामसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च येतो.
सामाजिक कार्यात रमलेले खांडबहाले यांचा एकूणच जीवन प्रवास, तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाची दखल घेत अमेरिकेच्या लेगाटम सेंटरने त्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, एमआयटीने डीन्स शिष्यवृत्ती, मास्टरकार्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती तसेच मॅग्रोहिल एज्युकेशन तसेच भारताच्या के. सी. महिंद्र ट्रस्ट आदींनी त्यांना विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊ केल्या आहेत. त्यांनी सुरू केलेल्या भारतीय भाषा तंत्रज्ञानावर आधारित खांडबहाले डॉट कॉम, ग्लोबल प्रॉस्पेरिटी फाऊंडेशन आणि कुंभमेळ्यावर आधारित कुंभथॉनसाठी ते वेळोवेळी भारतात परत येणार आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबातील खांडबहाले यांचे माध्यमिक शिक्षण पुणे विद्यार्थीगृहाच्या तळेगाव-अंजनेरी येथली विद्या प्रशाळेत झाले. पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी अहमदनगरच्या सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयातून तर पुणे विद्यापीठातून व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण भागात अतिशय खडतर परिस्थितीत मराठी माध्यमातून शिकलेले व ‘एज्युकेशन इज द अ‍ॅन्सर’ अर्थात ‘शिक्षण हेच उत्तर’ असा मंत्र जपणारे खांडबहाले यांची एमआयटी बोस्टन अमेरिका या जागतिक सर्वोत्तम विद्यापीठात इनोव्हेशन अ‍ॅण्ड ग्लोबल लीडरशीपसाठी झालेली निवड भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी मानली जात आहे.