खार येथे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या नोकरास अखेर गुन्हे शाखा ९ च्या पथकाने हिमाचल प्रदेशातील मनाली येथून अटक केली. सतनाम सचदेव असे या आरोपीचे नाव आहे. त्याने खार येथील एका वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करून घरातील रोख रक्कम आणि दागिने मिळून सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला होता.
खार पश्चिमेच्या मिश्रा हाऊसमध्ये हिराचंद जैन (८२) हे पत्नीसोबत राहतात. त्यांची देखभाल करण्यासाठी सतनाम सचदेव याला ठेवण्यात आले होते. १६ ऑक्टोबर रोजी सतनामने या दोन्ही वृद्ध जैन दाम्पत्यावर स्टीलच्या खलबत्त्याने प्राणघातक हल्ला करून घरातील रोख रक्कम, दागिने असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. सुदैवाने या दोन्ही दाम्पत्याचे प्राण वाचले होते.
या घटनेची गंभीरता पाहून सहपोलीस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ९ ला करण्याचे आदेश दिले होते. आरोपी मोबाइल वापरत नव्हता तसेच त्याचा पत्ताही कुणाकडे नव्हता. पण केवळ छायाचित्र आणि गुप्त बातमीदाराच्या मार्फत साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांनी सतनामचा शोध सुरू केला होता. १० नोव्हेंबरला सतनाम जालंधर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातर्डेकर, पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत यांच्यासह साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय दिघे, पोलीस नाईक पेडणेकर आणि वारंगे हे पंजाबमधील जालंधर येथे रवाना झाले. मात्र तेथून त्याने पोलिसांना चकमा दिला.
त्यानंतर तो हिमाचल प्रदेशातील कुलू परिसरात असल्याची माहिती मिळाली. अखेर गुरुवारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुलू परिसरात नाकाबंदी करून एका खासगी बसमधून पळून जात असलेल्या सतनामला पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखा ९ चे पथक सतनाम यांच्या शोधासाठी दहा दिवस पंजाब मधील जालंधर, लुधियाना तसेच हिमाचल प्रदेशातील कुलू मनाली येथे त्याचा शोध घेत होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) के प्रसन्ना, पोलीस उपायुक्त मोहन कुमार दहिकर, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ९ च्या पथकाने आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.