लेखानगर परिसरातील स्टाइलो फर्निचर दुकानाला सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेल्या आगीत तळमजल्यावरील लाकडी फर्निचर आणि कच्च्या मालासह साहित्य भस्मसात झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग विझविण्यास जवळपास दोन तास लागल्याने सव्‍‌र्हिस रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
लेखानगर परिसरातील सव्‍‌र्हिस रस्त्यावरील चौफुलीवर रमेश मिसारीया यांचे स्टाइलो फर्निचर हे आलिशान दुकान आहे. लाकडी तसेच लोखंडी फर्निचर विक्री करणाऱ्या दालनात सोमवारी नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात झाल्यानंतर ही घटना घडली. तळमजल्यावर असलेल्या खोलीत तसेच जिन्यावर फर्निचर, पॅकिंगसाठी लागणारी खोकी, टेबल, खुच्र्या, कापड, फोम, स्पंज, प्लास्टिक यांसह अन्य काही साहित्य अस्ताव्यस्त स्वरूपात पडलेले होते. अचानक तळमजल्यावर धूर येण्यास सुरुवात झाली. जिन्याकडून रस्ता असल्याने आग वरील दिशेने सरकली. त्यात जुने फर्निचर तसेच इतर साहित्य सापडले. कर्मचाऱ्यांनी तातडीने दुकानाबाहेर धाव घेतली. दरम्यानच्या काळात अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले. लेखानगर केंद्रातील २ तसेच शिंगाडा तलाव येथून १ बंब घटनास्थळी दाखल झाले. साधारणत: दोन ते अडीच तास पथकाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे बंब रस्त्यावर उभे असल्याने आणि दालनाला आग लागलेली असल्याने या मार्गावरील वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. आग पाहण्यासाठी वाहने तसेच बघ्यांची गर्दी जमली. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. शाळा तसेच कामकाजाची वेळ असल्याने वाहनधारकांना इंदिरानगर तसेच लेखानगर येथील पर्यायी मार्गाने मार्गस्थ व्हावे लागले. मात्र गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलीस यंत्रणेच्या नाकीनऊ आले. आगीत मोठे नुकसान झाले नसले तरी या घटनेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.