लोकलमधील वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वे व्यवस्थापनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करावी. नऊ डब्याच्या लोकल बंद होऊन त्याजागी १२ व १५ डब्यांच्या लोकल आल्या आहेत. नऊ डब्याच्या जागी मोटरमनची केबीन होती. ती अलिकडे बंद करण्यात आली आहे. त्या जागेत एक बाकडा टाकून ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची, प्रवासाची सोय रेल्वे प्रशासनाने केली तर ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवास करताना होणारी कुचंबणा थांबेल, अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी फेडरशनने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.
नोकरी व्यवसायानिमित्त दररोज सुमारे वीस हजार ज्येष्ठ नागरिक मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. खच्चून भरून जाणाऱ्या लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना चढणे शक्य नव्हते. अंध, अपंगासाठी जशी रेल्वे प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणे ९ डब्याच्या लोकलमधील एक बोगी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने उपलब्ध करून द्यावी, असे शिष्टमंडळाने प्रभू यांना सांगितले.

भ्रमणध्वनीद्वारे तिकीट आरक्षणाची माहिती द्यावी
रेल्वे आरक्षित तिकीटाची इत्यंभूत माहिती प्रवाशांना भ्रमणध्वनीवर उपलब्ध करून दिली तर प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी लागणारी धावाधाव कमी करावी लागेल. त्यामुळे आरक्षित तिकीटाची माहिती भ्रमणध्वनीवर उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणीही रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी आरक्षित तिकिट काढल्यानंतर त्यांना बसण्याच्या मूळ ठिकाणी जावे लागते. मुंबई ते चेन्नई प्रवास करणारे काही प्रवासी कर्जत, कल्याण येथे बसतात. या प्रवाशांना मुंबईला न जाता भ्रमणध्वनीवरच त्यांचा पीएनआर क्रमांक, बोगी क्रमांक रेल्वेने कळविला तर, प्रवाशांना फायदा होईल, असे  फेडरेशनने रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणले.