ठाणे-भिवंडी, विरार-वसई-पनवेल, पनवेल-कर्जत आदी मार्गावर उपनगरीय सेवा सुरू करा, कराड स्थानकाचा आदर्श रेल्वे स्थानक म्हणून विकास करा, आदी मागण्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रेल्वेमंत्री पवन बन्सल यांच्याकडे केल्या आहेत.
मुंबई महानगर प्रदेशातील वाढते नागरीकरण लक्षात घेता रेल्वेच्या विद्यमान सेवेत सुधारणा करण्याबरोबरच उपनगरीय प्रवाशांसाठी काही नवीन मार्गाचा समावेश यंदाच्या अर्थसंकल्पात करावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. ठाणे-भिवंडी आणि विरार-वसई-पनवेल उपनगरीय मार्ग, पनवेल- कर्जत, खोपोली मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करावी, विरार- डहाणू रोड- घोलवड मार्गाचे चौपदरीकरण, पनवेल-पेण दरम्यान उपनगरीय सेवा सुरू करावी आदी मागण्या मुख्यमंत्र्यांनी केल्या असून त्यासाठी येणाऱ्या खर्चातील काही भार उचलण्यास राज्य सरकारही तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची यंदा जन्मशताब्दी आहे. त्यामुळे आदर्श रेल्वे स्थानक योजनेमध्ये कराड स्थानकाचा समावेश करून या स्थानकाचे आधुनिकीकरण करावे तसेच नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या स्थानकांचाही आदर्श स्थानक म्हणून विकास करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.