एखाद्या व्यवसायात अपयश आले की माणूस खचून जातो. फारच कमी लोकअपयश पचवून पुन्हा यशाकडे झेप घेतात. मात्र, व्यवसायातील अपयशाने कुणी गैरकृत्यांकडे वळले असेल तर? लक्ष्मण जोगळेकर (४२) याने हा मार्ग चोखाळला. कुरियरच्या व्यवसायात आलेल्या अपयशाने लक्ष्मणला चोर बनवले. माटुंगा येथील मोनोपॉल कंपनीचे मालक प्रशांत पटेल यांना आलेला २२ लाखांचा धनादेश गायब झाल्याचे एक प्रकरण माटुंगा पोलिसांकडे आले होते. त्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना या टोळीचा छडा लागला. या टोळीने कुरियर कंपनीत आलेले धनादेश लंपास करून बनावट खाती उघडून त्यात वटवले होते. पोलिसांनी याप्रकरणात पाच आरोपींना अटक केली. या टोळीचा म्होरक्या लक्ष्मण जोगळेकरच्या जबानीतून ही विलक्षण माहिती दिली.
व्यावसायिक बनला ठकसेन
लक्ष्मण जोगळेकर हा चांगल्या घरातील सुशिक्षित तरुण होता. काही वर्षांपूर्वी त्याने स्वताची कुरियर कंपनी काढली. त्यात त्याला आर्थिक नुकसान झाले आणि त्याची कंपनी बंद पडली. पण कुरियर कंपनीचे बारकावे त्याने आत्मसात केले. तेथूनच त्याला ठकबाजीची कल्पना सुचली. मोठय़ा कंपन्या आपले धनादेश कुरियर कंपनीमार्फत पाठवत असतात. छोटे धनादेश मधल्या मध्ये गायब केले तर काही फरक पडत नाही, हे त्याने जाणले होते. तेथूनच त्याने आपली योजना बनवली. पाच वर्षांपूर्वी त्याने या कामाला सुरवात केली होती.
अशी करायचा फसवणूक
या कामासाठी जोगळेकरला मुले हवी होती. त्याने मग नोकरी देणारी प्लेसमेंट कंपनी उघडली. त्यात मुलांना नोकरी देतो म्हणून सांगितले. त्यात जी मुले कामाला यायची त्यापैकी काहींना त्याने या कामासाठी तयार केले. रोहीत गायकवाड नावाच्या तरुणाला त्याने राहुल बोराडे नावाने एका कुरियर कंपनीत कामाला लावले. रोहीत या कुरियर कंपनीत येणारे धनादेश पळवून लागला. ज्या कंपनीच्या नावाने धनादेश असतील त्या कंपनीच्या नावाने जोगळेकर बनावट बॅंक खाती बनवू लागला. त्यासाठी तो प्लेसमेंटसाठी येणाऱ्या अर्जाच्या कागदपत्रांचा वापर करत असे. नंतर ही कागदपत्रे फेकून देत होता. सुनिल कुवार, रघुत्तम नामण्णा, मंजुनाथ घाडके हे तीन तरूण बनावट नावाने बॅंक खाती उघडत आणि चोरलेले धनादेश वटवून पैसे काढत असत. त्या मोबदल्यात त्यांना कमिशन मिळत असे. राजरोस त्यांची ही फसवणुक चालायची. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती असल्याने पोलिसांना या टोळीचा छडा लावता येत नव्हता. मोनोपॉल या कंपनीचे २२ लाख रुपयांचे धनादेश त्यांनी अशाच पद्धतीने लंपास करून वटवले होते. परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय बागवे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणाचा छडा लावून या टोळीला गजाआड केले. आतापर्यंत या टोळीने कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले. जोगळेकरवर यापूर्वी नवी मुंबई, पुणे येथे अशाच पद्धतीचे पाच गुन्हे दाखल होते. त्यातून सुटल्यावर त्याने पुन्हा हे काम सुरू केले.
मोठा हात त्याला मारायचा होता. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळ्ल्या. त्याच्या घरातून पोलिसांना पाच लाख रुपये रोख, विविध बॅंकांचे खाते उघडण्याचे १९ अर्ज, १७ बंॅकांचे एटीएम कार्ड, बनावट रबरी स्टॅंप, १५ मोबाईल फोन्स, १८९ चोरलेले धनादेश, पासबुक हस्तगत करण्यात आले. ही टोळी वेळीच जेरबंद झाली नसती तर आणखी कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला गेला असता असे ठाकूर यांनी सांगितले.