पहिल्याच प्रा. डॉ. र. बा. मंचरकर स्मृती जीनवगौरव पुरस्कारासाठी औरंगाबाद येथील ज्येष्ठ समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांची निवड करण्यात आली आहे. नगर येथे दि. २ मार्चला आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
दिवंगत ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. र. बा. मंचरकर यांच्या नावाने अलिकडेच स्थापन करण्यातोलेल्या स्मृती प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. अभिजित मंचरकर यांनी ही माहिती दिली. समीक्षेतील कार्यासासाठीच हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून ११ हजार रूपये रोख, शाल व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.
ज्येष्ठ समीक्षक, संशोधक, फर्डे वक्ते व आदर्श शिक्षक म्हणुन प्रा. डॉ. र. बा. मंचरकर या क्षेत्रात परिचित होते. रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापन करतानाच त्यांनी ५०० पेक्षा अधिक वाडमयीन विषयांवर शोधनिबंध लिहिले. त्यांच्या या कार्याची स्मृती म्हणुनच दरवर्षी समीक्षेसाठी जीवनगौरव पुरस्कार देण्याचा
निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे.
त्यांच्या ‘संतांची कविता’ या प्रा. दत्तात्रय गंधारे संपादित पुस्तकाचे प्रकाशनही या कार्यक्रमात होणार आहे.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख प्रा. कवठेकर यांना पहिलाच जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांचे ‘हैद्राबादचा मुक्तिसंग्राम-एक उपेक्षित संघर्षगाथा’, ‘दलित साहित्य-एक आकलन’, ‘स्वा. सावरकर साहित्य आणि जीवननिष्ठा’ असे समीक्षात्मक ग्रंथ प्रसिध्द आहेत. शंभरपेक्षा अधिक शोधनिबंध त्यांनी लहिले आहेत अशी माहिती मंचरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी दिली.