न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय पक्षप्रणीत उत्सव मंडळांनी दहीहंडीचा उत्सव रद्द केला. हा निर्णय मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडला आहे. दहीहंडी उत्सवातील वर्गणी बचतीने आणि गणेशोत्सवासाठी जमा झालेल्या वर्गणीने मंडळाचा निधी वाढला असल्याने मंडळांची चांदी झाली असून खर्च करण्यासाठी मंडळांच्या अध्यक्षांनी (नेत्यांनी) देखील हात सैल सोडला आहे.
दरवर्षी मोठा खर्च करत एखाद्या पंचतारांकित कार्यक्रमासारखा साजरा होणारा दहीहंडी उत्सव यंदा पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. यामुळे नवी मुंबईतील अनेक उत्सवांकडे सिनेमातील कलाकारांनी पाठ फिरवली होती. तसेच मोठय़ा प्रमाणात पारितोषिक आणि वाद्यवृंदांवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत झाली. मुळात हा खर्च मंडळांनी जमा केलेल्या लोक  (व्यापारी आणि फुटपाथवरील विक्रेत्यांकडून)  वर्गणीतूनच केला जात असताना आयोजकांना पैशाचा तोटा नसतो. मात्र दहीहंडीतील बचतीमुळे मोठय़ा प्रमाणात निधी शिल्लक राहिल्याने मंडळ कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही मंडळे याला अपवाद आहेत. काही मंडळांकडून जमा झालेल्या लोकवर्गणीतून वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतो. लोकांकडून जमा झालेली वर्गणी लोकहितासाठीच खर्च केली जाते. मात्र अशी हातावरील बोटांवर मोजता येतील इतकीच मंडळे आहेत. अन्यथा लोकवर्गणी, दानपेटीत जमा होणारी रक्कम आणि मंडपात लावण्यात आलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून जमा झालेल्य रकमेचा मंडळांकडून विनियोग कसा होतो हा संशोधनाचा विषय आहे.
दहीहंडी उत्सवातील शिल्लक राहिलेला चंदा आणि त्या वेळी लुटता न आलेली आंनदाची भरपाई गणेशोत्सव कालावधीत होणार आहे. यामुळे मंडळाकडूनदेखील मोठय़ा प्रमाणात कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून होऊ दे खर्च..अशी भूमिका अनेक राजकीय नेत्यांनी घेतली आहे. तसेच उत्सवानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे त्यांना आलेला थकवा घालविण्यासाठी योग्य नियोजनदेखील या नेत्यांनी केले आहे.