कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १२ एप्रिल ते २७ मे या कालावधीत मुंबईत पाच ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या १२ वर्षांंपासून होत असलेल्या या महोत्सवात कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा रत्नागिरी व देवगड येथील शेतकऱ्यांच्या बागेतून थेट मुंबईकरांपर्यंत मधले दलाल व हुंडेकरी यांना डावलून पोहचवला जातो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी जास्तीत जास्त दर मिळतो आणि मुंबईकरांना कार्बाईडरहित अस्सल हापूस आंबा चाखायला मिळतो. कर्नाटक व तामिळनाडू येथील हापूससदृश आंबे विकून ग्राहकांची होणारी फसवणूक या महोत्सवामुळे कमी झाल्याचा आयोजकांचा दावा आहे.
यंदा होणाऱ्या आंबा महोत्सवाचे ठिकाण व कालावधी पुढीलप्रमाणे : डॉ. हेडगेवार मैदान, हनुमान रोड, विलेपार्ले (पूर्व)-१२ ते २० एप्रिल, स्वा. सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)- २१ ते ३० एप्रिल, न्यू इंग्लिश स्कूल मैदान, राम मारुती रोड, ठाणे- १ ते ९ मे, संभाजी राजे मैदान, मुलुंड (पूर्व)- १० ते १८ मे आणि एम.एच.बी. कॉलनी मैदान, बोरिवली (पश्चिम)- १९ ते २७ मे.
मार्चपर्यंत लांबलेली थंडी व थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव यामुळे गेल्या २५ वर्षांतील सर्वात कमी, म्हणजे ३० टक्केच आंब्याचे पीक हाती लागणार असल्याने कोकणातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुंबईकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे यांनी पत्रपरिषदेत केले. अधिक माहितीसाठी ९८६९०१६०९२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.