एप्रिल-जून हा फळांचा मोसम आहे. बाजारात मोठय़ा प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची विक्री केली जात आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यातून फळांचा राजा आंबाही सुटलेला नाही. आंबा पिकविण्यासाठी विक्रेत्यांकडून रासायनिक पदार्थाचा (कॅल्शियम काबाईड) उपयोग केला जात असल्याचे दिसून येत आहे.
अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात सरबत आणि पाणीपुरी विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. या विभागांनी आंब्याबाबतही चौकशी केली केली जात आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विक्रीला आले आहेत. आंब्याची चव घ्यायची एवढेच माहिती असलेल्या ग्राहकाला नेमका आंबा कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखणे कठीण झाले आहे. बाजारात रत्नागिरी, हापूस, देवगड हापूस, केशर, बेगमपल्ली अशी आंब्याची नावे घेऊन दुकानदार त्याची विक्री करीत आहेत. ८०० ते १००० रुपये किलो प्रमाणे हापूस आंब्याची विक्री केली जात आहे. त्यातही कच्चा माल स्वस्तात आणून त्यात रासायनिक औषधांचा वापर करून तो ग्राहकांना विकला जातो. आंब्यासहा सर्व प्रकारची फळे विकत घेऊन आपण त्याचा आस्वाद घेत असतो. मात्र, रासायानिक पदार्थाचा उपयोग केलेली फळे आरोग्यास किती अपायकारक याचा विचार करीत नाही. या संदर्भात शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांशी संवाद साधण्यात आला असता आहारतज्ज्ञ डॉ. मेधा पाटील म्हणाल्या, रासायानिक पदाथार्ंचा वापर करून जी फळे बाजारात विकली जातात ती मनुष्याच्या शरीराला घातक असून त्याचा परिणाम पोटाच्या आतडय़ावर आणि किडनीवर होत असतो. मुळात फळांमध्ये जी जीवनसत्वे असतात ती रायायनिक पदार्थामुळे नष्ट होऊन जातात. त्यामुळे अशा फळामधून जीवनसत्व काहीच मिळत नाही. उलट शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. विशेषत: लहान मुलांच्या किडनी आणि आतडय़ावर त्याचा जास्त परिणाम होतो. वेगवेगळी फळे रायानिक औषधांमध्ये साठवून ठेवल्यामुळे ती पाण्यात टाकल्यानंतर फॉस्फेरिक अ‍ॅसिड असा वायू तयार होत असतो आणि त्यामुळे शरीराची हाड ठिसूळ होत असतात. त्यामुळे पालकांनी फळाविषयी जागृत राहणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर म्हणाले, फळे पिकविण्यासाठी रासायनिक औषधांचा उपयोग केला जात असून तो  लहान मुलांसाठी अतिशय घातक असतो. या कॅल्शीयम औषधांपासून अ‍ॅसिटीलीन नावाचा वायू तयार होत असतो आणि त्याचा परिणाम मेंदूवर होत असतो. लवकर पिकवलेली फळे खाल्ली तर ताप येणे, मळमळ करणे, उलटय़ा होणे, जुलाब लागणे, आदी परिणाम होतात. या संदर्भात कळमना बाजार असोशिएशनचे अध्यक्ष राजेश छाबरिया यांनी सांगितले, कळमना बाजारपेठेमध्ये रत्नागिरी, आंध्रप्रदेश, कर्नाटक भागातून आंबा मोठय़ा प्रमाणात विक्रीला आहे. साधारणात रोज १०० ते १५० ट्रक माल येत असतो. बाजारात हापूस आंबा मोठय़ा प्रमाणात विक्रीला आला आहे. गेल्या काही दिवसात रासायनिक औषधांचा वापर फार कमी केला जातो आणि काही विक्रेते करीत असले तरी ते ग्राहकांना फळे स्वच्छ करून देत असल्याचे छाबरिया म्हणाले.