रंगशारदा प्रतिष्ठानतर्फे १७ ते १९ मे या कालावधीत माणिक वर्मा संगीतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंत नाटय़ मंदिर, दादर (पश्चिम) येथे दुपारी ४ ते ७ या वेळेत हा महोत्सव होणार आहे. संगीतोत्सवाचे यंदा १७ वे वर्ष आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. १८ मे रोजी ‘कस्तुरीगंध’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. संगीत संयोजक आप्पा वढावकर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी या वेळी सादर होणार आहेत. संगीतोत्सवाचा समारोप ‘ये मौसम है रंगीला’ या कार्यक्रमाने होणार असून यात मराठी संगीत नाटकातील हिंदी गाणी सादर केली जाणार असल्याचे रंगशारदा महोत्सव योजनेच्या अध्यक्षा शुभदा दादरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.