मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा प्रचंड ताण हा विषय ऐरणीवर आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने क्षमतेपेक्षा खूप तास अधिक काम करावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. उरणसारख्या औद्योगिकदृष्टय़ा झपाटय़ाने वाढणाऱ्या तसेच लोकसंख्येनेही विस्तारणाऱ्या उरण तालुक्याच्या संरक्षणासाठी १९२ पोलीस कर्मचाऱ्यांची मंजुरी असताना अवघे १०० पोलीस कर्मचारी तैनात आहेत, तर उरण पोलीस ठाण्यात ९२ पोलीस कर्मचारी कमी असल्याने येथील पोलीस कर्मचाऱ्यांवरही कामाचा प्रचंड ताण पडत आहे. हे प्रमाण सरासरी २० हजार नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी असे आहे.
अनेक ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये मंजूर पदांपेक्षा कमी पोलीस संख्या असल्याचे चित्र आहे. या संदर्भात मागील अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची मागणी करूनही कर्मचारी दिले जात नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांकडूनच काम करून घेतले जात असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. पोलिसांच्या कामाचे तास निश्चित नसल्याने तसेच अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना तीन ते चार तासांचा प्रवास करून यावे लागत असल्याने अनेकांचा वेळ हा कामानंतर प्रवासातच जात असल्याची माहिती एका पोलीस हवालदाराने दिली. त्यामुळे काम आणि प्रवास असा दोन्हीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेली स्टेशनरी असो की बीट मार्शल पोलीस कर्मचाऱ्यांना गस्तीसाठी लागणारे पेट्रोल असो पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:च्या खर्चाने या गरजा भागवाव्या लागत आहेत. त्यामुळे शासनाने पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सुविधांबरोबरच आवश्यक साहित्य, पेट्रोल आणि त्याचा खर्च वेळेत देण्याचीही मागणी होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे तणावातून होणाऱ्या आत्महत्या आणि हत्या थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मते पोलीस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहेत.
सध्याच्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या ही पोलीस ठाण्यांची स्थापना झाली तेव्हा होती तितकीच आहे. उरण परिसरात झालेल्या औद्योगिक विभागाचा विस्तार आणि झपाटय़ाने वाढणाऱ्या नागरी वस्तीचा प्रचंड ताण पडू लागला आहे.