आपणाकडे मोठी युवाशक्ती असून जगाला आवश्यक मनुष्यबळ व उत्पादने पुरविण्याची क्षमता भारताकडे आहे. इतर देशांनी भारताकडे लक्ष केंद्रित केले असून ही आपणासाठी मोठी संधी आहे. याचा लाभ उठवत ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’साठी राज्य शासन पुढील काळात कौशल्य प्रशिक्षणावर भर देणार आहे. याद्वारे ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ आकारास येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
गंगापूर रोडवरील नक्षत्र लॉन्स येथे लघुउद्योग भारतीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, टीजेएसबीचे उपाध्यक्ष विद्याधर वैशंपायन, लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष भूषण वैद्य आदी उपस्थित होते. अमेरिका तसेच चीन या प्रगत देशांकडे उद्योजकता असली तरी पुरेसे मनुष्यबळ त्यांच्याकडे नाही. यामुळे आगामी काळात हे देश भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याने या संधीसाठी आपण तयार असले पाहिजे याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा मोठा वाटा आहे. रोजगारनिर्मिती करून देशाच्या उत्पादकतेत मोठा हिस्सा असलेले क्षेत्र म्हणून उद्योगक्षेत्राकडे पाहिले जाते. राज्य शासन कौशल्य विकासावर भर देणार असून आपणास आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व उद्योगांनी शासनाच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत लघुउद्योगांचा फार मोठा वाटा आहे. भारताची उद्योग धोरणे तयार करण्यासाठी लघुउद्योग भारतीने मोठे योगदान दिले आहे. या संघटनेच्या  मागण्यांबाबत राज्य शासन लवकरच धोरणात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले. उद्योजकांसाठी सर्व परवाने एका छताखाली उपलब्ध करण्यात येतील. तसेच ‘इन्स्पेक्टर राज’ संपविण्यासाठी शासनाने धोरण तयार केले असून, कंपन्यांच्या चौकशीचा आराखडा शासन ठरवून देणार आहे. यामुळे ऐनवेळी इन्स्पेक्टरने कुठल्या ठिकाणी तपासणी करावी हे कळवले जाईल. तपासणीनंतर ७२ तासांत शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे. सध्याचा कामगार कायदा उद्योजक या दोघांना अडचणीचा आहे. यामुळे कामगारांचे हित जपले जावे, त्यांना रोजगारासह सुरक्षितता व सुविधा मिळाव्यात यासाठी कामगार कायद्यात लवकरच बदल करण्यात येतील. यासाठी कामगार संघटनांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. लघुउद्योग भारतीचे नाशिक अध्यक्ष मारुती कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अधिवेशनास राज्यातील उद्योजक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.