सरसो दा साग आणि मक्के की रोटी या खास पंजाबी पदार्थाबरोबरच छोले-भटुरे, दालफ्राय, रोटी, नान, आलू पराठा, दम आलू, दाल तडका आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मुंबई आणि महाराष्ट्रातील कोणत्याही हॉटेलमध्ये मिळतात. पंजाबमध्ये मात्र मराठमोळे खाद्यपदार्थ मिळत नाहीत. ही उणीव जीवन साठे, सचिन सोनावणे, कुणाल शिंदे या तीन मराठी मंडळींनी भरून काढली आहे. पंजाबमधील घुमान येथे अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थाचे ‘मराठी तडका’ हे हॉटेल स्वातंत्र्यदिनापासून सुरु झाले आहे.
पंजाबचे शिक्षणमंत्री डॉ. दलजीत चीमा यांच्या हस्ते ‘मराठी तडका’चे उद्घाटन झाले. घुमानमध्ये होणाऱ्या ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुरु झालेल्या या ‘मराठी तडका’मध्ये पुरणपोळी, श्रीखंड-पुरी, ज्वारी आणि बाजरीची भाकरी, पिठले, गव्हाची पोळी, अस्सल महाराष्ट्रीयन राइस प्लेट आणि वडा पाव, झणझणीत मिसळ, कांदा-बटाटा भजी चापण्यासाठी आता दर्दीची गर्दीही सुरू झाली आहे. लवकरच तेथे अळूवडी, कोथिंबीर वडीही मिळणार आहे.
महाराष्ट्रात ‘शेर ए पंजाब’ असू शकते तर पंजाबमध्ये मराठी खाद्यपदार्थ देणारे हॉटेल का नसावे, हा विचार करून घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही हे हॉटेल सुरु केले आहे. माझे मामा जीवन साठे, मी आणि माझा भाचा कुणाल शिंदे अशी आमची तीन कुटुंबे या हॉटेलच्या निमित्ताने घुमानमध्ये स्थायिक झालो आहोत.
पर्यटनासाठी पंजाबला येणाऱ्या मराठी पर्यटकांना घरचे जेवण मिळावे तसेच संमेलनासाठी येणाऱ्या साहित्य रसिकांचीही सोय व्हावी या उद्देशाने आम्ही हे हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे ‘मराठी तडका’चे सचिन सोनावणे यांनी सांगितले. महाराष्ट्रीयन पदार्थ तयार करताना आम्ही खास आपलेच मसाले वापरणार आहोत.
हे पदार्थ तयार करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून खास आचारी घुमानला घेऊन आलो आहोत. काही स्थानिक पंजाबी कुटुंबांनी ‘मराठी तडका’ला भेट दिली असून पसंतीची पावतीही दिली आहे, असे सोनावणे म्हणाले.