अगाथा ख्रिस्तीच्या गाजलेल्या कादंबरीवर बेतलेला ‘अशाच एका बेटावर’  हा चित्रपट पाहताना वारंवार ‘गुमनाम’ या हिंदी चित्रपटाची आठवण होत राहते. चित्रपटाच्या नावावरून आणि पोस्टर पाहिल्यावरही कथानकाचा अंदाज प्रेक्षकाला येतो. हा चित्रपट रहस्यमय असल्यामुळे मध्यांतरापर्यंत ‘गुमनाम’पेक्षा वेगळे काही पाहायला मिळेल असे वाटत राहते. परंतु, सरधोपट पद्धतीने जात असल्यामुळे उत्कंठा मात्र राहत नाही. जाहिरात क्षेत्रात नावाजलेला नवा दिग्दर्शक मात्र या चित्रपटाने दिला आहे.
दिग्दर्शकाचा पहिलाच प्रयत्न असेल आणि निर्मातेही नवीनच असतील तर गल्लापेटीवर यशस्वी ठरतील असा फॉम्र्युला मांडण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून कदाचित अगाथा ख्रिस्तीच्या अतिशय गाजलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपट करण्याची कल्पना पुढे आली असावी. टीव्हीवरील ‘आहट’ या मालिकेमुळे तसेच रामसे स्टाइलच्या रहस्यमय चित्रपटांच्या कथानकांचा अंदाज आता प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे येऊ लागला आहे. त्याचप्रमाणे हॉलीवूडमध्ये गाजलेल्या रहस्यपट व थरारपटांचे कथानकही प्रेक्षकांना चांगलेच माहितीचे झाल्याने रहस्यमय चित्रपट बनविताना आपल्याकडे त्याच पद्धतीचे कथानक वापरले तर प्रेक्षकांना ‘जुन्या बाटलीत नवी दारू’ असे वाटण्याचीच शक्यता अधिक असते. या चित्रपटामध्येही चांगले कलावंत आहेत. पात्र निवडही दिग्दर्शकाने अचूक केली आहे, तरीसुद्धा ‘गुमनाम’चा ठसा जात नाही.
नोकरीच्या शोधात असलेली तरुणी (मधुरा वेलणकर), बारमध्ये नृत्य करणारी तरुणी (सई ताम्हणकर), पूर्वी पोलिसांत असलेला पण आता गुप्तहेर असलेला तरुण (अंकुश चौधरी), डॉक्टर (संजय मोने), बनावट संन्यासी (मंगेश देसाई), एक निवृत्त न्यायाधीश (यतीन कार्येकर), भुरटय़ा चोऱ्या करणारा (कमलेश सावंत), बेटावरच्या बंगल्याची देखभाल करणारे जोडपे (संजय नार्वेकर व पूनम जाधव), आणखी एक सर्वसामान्य माणूस (शरद पोंक्षे) अशा नऊ जणांना पैशांच्या पाकिटासह एका बेटावर येण्याचे निमंत्रण मिळते. काहीसे अचंबित झालेले हे नऊ जण जाऊया तर खरे म्हणत बोटीने निघतात. सगळ्यांना घेऊन बोट बेटावर येते आणि मग सुरू होतो एकामागून एकाच्या हत्येचे सत्र. चित्रपटाच्या सुरुवातीला व्यक्तिरेखांची ओळख करून देताना गूढ वाटायला लागते. बेटावरील हवेली की टुमदार आलिशान बंगल्यात नोकराविना कुणीच नसते.
सर्व सोयीसुविधा मात्र तिथे असतात. हा बंगला, त्याचा सेट, तिथल्या वस्तूंची मांडणी यातून दिग्दर्शक चित्रपट गूढ असल्याचे सुचवितो. परंतु, भीती वाटावी अशा घटनाच घडत नाहीत. त्याच बरोबर या बेटावर पोहोचलेल्या नऊ जणांमध्ये एकमेकांशी नव्याने निर्माण झालेले नाते अधोरेखित करण्याचा प्रयत्न कथानकातून करण्यात न आल्याने प्रेक्षकांशीही त्यांचे नाते जुळत नाही. त्या सुटय़ा सुटय़ा राहतात. उच्च निर्मितीमूल्ये असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवा दिग्दर्शक मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. परंतु, गुमनाम चित्रपटाची आठवण करून देत असल्यामुळे प्रेक्षकांवर अपेक्षित परिणाम करत नाही.
सृष्टी फिल्म्स प्रस्तुत ‘अशाच एका बेटावर’
निर्माते – लीना नांदगावकर, जावेद पठाण, दिवाकर सावंत, विशेष कार्यकारी निर्माता – सुहास पांचाळ, दिग्दर्शक – संजू हिंगे, पटकथा-संवाद – संजय पवार, चिंतन मोकाशी, छायालेखन – राजू केजी, संगीत -मिलिंद जोशी, गीते – रोहिणी निनावे, सदानंद डबीर, मिलिंद जोशी, संकलन – क्षितिज पावसकर, अभिजीत गिरुळकर, कलावंत – अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संजय मोने, यतीन कार्येकर, सई ताम्हणकर, शरद पोंक्षे, मंगेश देसाई, कमलेश सावंत, पूनम जाधव.