मराठी चित्रपटांना या वर्षी मिळालेल्या ‘लय भारी’ यशाचा आनंद शुक्रवारी ‘ताज लँड्स’मध्ये लय.. लय.. लय.. भारी मस्तीत आणि जल्लोषात साजरा झाला. मराठी कलाकार दरवर्षी एकत्र येऊन मोठय़ा प्रमाणावर धुळवड साजरी करतात. या वर्षीही त्यांनी त्याच जल्लोषात धुळवड साजरी केली, मात्र त्याला ‘पंचतारांकित’ झळाळी देण्यात आली होती. मराठी चित्रपटांनी इतक्या मोठय़ा प्रमाणावर यश मिळवले आहे की त्याचे जोरदार सेलिब्रेशन व्हावे, अशी आमची अपेक्षा होती. म्हणून पहिल्यांदाच ‘ताज’मध्ये एकत्र येत धुळवड साजरी केल्याचे अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितले.
गेली कित्येक वर्षे गोरेगावच्या बिंबिसारनगरमध्ये नाही तर दादरमध्ये जिथे मराठी कलाकार मोठय़ा संख्येने राहतात. तिथे सगळे एकत्र येऊन धुळवड साजरी करायचे. गायक-दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी या वेळी पुढाकार घेत धुळवडीच्या सेलिब्रेशनलाही एक नवा पायंडा सुरू करायचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार यंदा वांद्रे येथील ‘ताज लँड्स’मध्ये तमाम मराठी कलाकारांनी एकत्र येत धुळवड साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘आला होळीचा सण लय भारी..’ या नावाने शुक्रवारी ‘ताज’मध्ये मराठी कलाकारांनी रंगारंग धुळवड साजरी के ली. आम्ही सगळेच इथे एकत्र जमलो आहोत. आम्हाला एकाच प्रकारचे सफेद रंगाचे टी-शर्ट्स देण्यात आले आहेत. टी-शर्ट्सवर पुढे ‘रंगकर्मी’ असे लिहिले आहे आणि आम्ही सगळे रंगकर्मी वेगवेगळ्या रंगांत रंगून गेलो आहोत, असे अभिनेता सचित पाटील याने सांगितले. पहिल्यांदाच ताजसारख्या ठिकाणी धुळवड साजरी झाली आहे, त्यामुळे इथली एक मजा वेगळीच आहे. अवधूत गुप्ते, राहुल रानडे, अजित परब यांच्या जोडीला अभिनेता जितेंद्र जोशी या सगळ्यांनी स्टेजवर माईक हातात घेतले आहेत. छान गाणी, संगीत आणि सगळ्यांनी धरलेलाठेका अशी एकच धम्माल सुरू असल्याचे सचितने सांगितले. दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता चिन्मय मांडलेकर, जयवंत वाडकर, संतोष जुवेकर अशी मराठी कलाकारांची मांदियाळीच या पंचतारांकित धुळवडीसाठी उपस्थित झाली होती. दरवेळी आम्ही बाहेर रंगपंचमी खेळतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांची गर्दी असते. त्यामुळे बाहेर खेळताना काही समस्याही निर्माण होतात. इथे तसे काहीच नाही आहे. बघ्यांच्या गर्दीचा प्रश्न नाही, इंडस्ट्रीतील माणसे सोडली तर बाहेरचे कोणीच नाही आहेत. त्यामुळे कुठल्याही दडपणाविना एकाच घरची मंडळी खूप दिवसांनी आणि चांगल्या निमित्ताने एकत्र आली असल्यासारखे सगळे कलाकार आनंदाने रंगपंचमी खेळत आहेत, असे सुशांतने सांगितले. ‘इको फ्रेंडली’ रंगांचा वापर करण्याबरोबरच दुष्काळाचे भान राखून पाण्याचा कमीत कमी वापर करीत आम्ही रंगपंचमी साजरी करतो आहोत. नाच-गाण्यांची धम्माल, वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची रेलचेल आणि जोडीला कलाकारांच्या सादरीकरणाचे नवनवे रंग यामुळे पहिल्यांदाच मराठी कलाकारांची पंचतारांकित ‘लय भारी’ धुळवड साजरी झाली.