यंदाची विधानसभा निवडणूक ‘मराठी विरूद्ध अमराठी’ हा वाद पेटवणारी ठरली असली तरी २०१४च्या निवडणुकीने मुंबईला गेल्या वेळपेक्षा ९ मराठी आमदार जास्त दिले आहेत. त्यामुळे, मुंबईतील मराठी आमदारांची संख्या २५वर गेली आहे. गेल्या वेळेस ही संख्या केवळ १५ होती. मात्र, ‘मुंबईतील मराठी माणसाचे हितसंबध हे मराठी आमदार, खासदार किंवा नगरसेवक सांभाळतात हा भ्रम आहे. कारण, जोपर्यंत मराठी माणसाचे प्रश्न, हितसंबंध यांबाबत मराठी समाजातून दबाव अथवा क्षोभ उसळत नाही, तोपर्यत आमदारांची संख्या वाढली तरी काही उपयोग नाही,’ असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
मुंबईत कुलाबा ते मुलुंड आणि दहिसपर्यंत ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी केवळ १५ जागांवर गेल्या वेळेस मराठी उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु, यंदा ही संख्या तब्बल नऊने वाढली आहे. यापैकी केवळ भाजपचे विनोद तावडे यांचा अपवाद वगळता जे काही मराठी आमदार वाढले आहेत ते काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा खेचूनच. याचा अर्थ मुंबईत काँग्रेसची पीछेहाट मराठी आमदारांचा टक्का वाढविण्यास कारणीभूत ठरते, असा अर्थ कुणी लावू शकतो. परंतु, मराठी विरूद्ध अमराठी मुद्दा पेटला की जाणीवपूर्वक मराठी उमेदवार दिले जातात.
हे कारण देखील मुंबईतील मराठी टक्का वाढण्यास कारणीभूत ठरले आहे. अर्थात मराठी विरूद्ध अमराठी (विशेषत: गुजराथी) हा मुद्दा पेटविणाऱ्या शिवसेनेबरोबरच या मुद्दय़ावरून बचावाचा पावित्रा घेणाऱ्या भाजपचेही मराठी आमदारही हा टक्का वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत.
गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत मराठीच्या मुद्दय़ावरून राजकारण करणारी शिवसेना निवडून येत आहे. पण, त्यामुळे काही फरक पडला का? मराठी विरूद्ध गुजराथी हा वादही प्रतीकात्मक पातळीवरच आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात उपस्थित केलेल्या वादातील फोलपणा लक्षात आलाच आहे. शिवसेनेनेही मराठीच्या मुद्दय़ाचा वापर मते मिळविण्याकरिता केला. अर्थात याचा अर्थ या मुद्दय़ात जीव नाही असे नाही. कारण, हा मुद्दा केवळ मुंबईपुरता नसून व्यापक आहे. शिक्षण, सार्वजनिक वापरात असलेल्या भाषा अशा अनेक पातळ्यांवर हा विषय चर्चिला गेला पाहिजे. पण, राजकारणी या मुद्दय़ाचा जीव लहान ठेवतात.
प्रा. डॉ. अरूणा पेंडसे,
राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ

मतदारसंघ             आधीचे आमदार                  आता निवडून आलेले
वर्सोवा         बलदेव खोसा (काँग्रेस)              भारती लव्हेकर(भाजप)
अंधेरी (पू)         सुरेश शेट्टी (काँग्रेस).            रमेश लटके (शिवसेना)
विलेपार्ले        कृष्णा हेगडे (काँग्रेस)            पराग अळवणी (भाजप)
अणुशक्ती नगर  नवाब मलिक (राष्ट्रवादी)             तुकाराम काते (शिवसेना)
कालिना      कृपाशंकर सिंग (काँग्रेस)            संजय पोतनीस (शिवसेना)
वांद्रे (प)      बाबा सिद्दिकी (काँग्रेस)            आशीष शेलार (भाजप)
बोरिवली      गोपाळ शेट्टी (भाजप)            विनोद तावडे(भाजप)
दिंडोशी           राजहंस सिंह (काँग्रेस)            सुनील प्रभू (शिवसेना)
कांदिवली (पू)     रमेशसिंग ठाकूर (काँग्रेस)            अतुल भातखळकर(भाजप)