मराठी टक्क्याबरोबरच विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरल्याने नाइलाजास्तव बंद कराव्या लागलेल्या ग्रँट रोडमधील शेठ धरमसिंह गोविंदजी ठाकरसी हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव नवसंजीवनी देऊन मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांसाठी शिक्षणाचे दालन खुले करण्यासाठी गोखले एज्युकेशन संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे. जोडीला माजी विद्यार्थ्यांनीही मदतीचा हात पुढे केला असून संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीला माजी विद्यार्थी धावून आले आहेत. मुंबईत एकामागून एक अशा अनेक मराठी शाळा बंद पडत असताना डीजीटी शाळा सुरू करून गोखले एज्युकेशन संस्था आणि माजी विद्यार्थी एक नवा आदर्श निर्माण करीत आहेत.
शेठ धरमसिंह गोविंदजी ठाकरसी हायस्कूल, डीजीटी हायस्कूल म्हणून ग्रँट रोड आणि आसपासच्या परिसरात प्रसिद्ध आहे. गिरगाव परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी गोखले एज्युकेशन संस्थेने १९१२ मध्ये ग्रँट रोडमधील दोन हत्ती मार्गासमोरील साईबाबा मंदिराजवळ डीजीटी शाळा सुरू केली. या शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा. पी. ए. कुळकर्णी यांचा सिंहाचा वाटा होता. शाळा सुरू होताच काही वर्षांतच विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि हा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. या शाळेतील असंख्य विद्यार्थी आजघडीला सरकारी कार्यालये, खासगी कंपन्यांमध्ये मोठय़ा पदावर कार्यरत आहेत. विविध क्षेत्रांतही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडली आहे. प्रख्यात डॉक्टर हेमंत वाकणकर, हिंदुजा रुग्णालयाचे माजी प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. प्रमोद लेले, चित्रपट अभिनेते अशोक सराफ, अभिनेते नितीश भारद्वाज, राजकीय नेते आशीष शेलार आदी मंडळी याच शाळेचे विद्यार्थी.
कालौघात गिरगाव, ग्रँट रोड परिसरातील मराठी टक्का घसरला आणि या शाळेची पटसंख्या हळूहळू घसरू लागली. विद्यार्थी नसल्यामुळे संस्थेने अखेर नाइलाजास्तव २००८ मध्ये ही शाळा बंद केली. शाळा बंद झाली असली तरी २०१२ मध्ये डीजीटी हायस्कूलचा शतक महोत्सव साजरा करण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला आणि डीजीटी हायस्कूल शताब्दी सोहळा समिती स्थापन केली. माजी विद्यार्थी संघटित झाले आणि त्यांनी ८ डिसेंबर २०१२ रोजी शतक महोत्सव साजरा केला. जुन्या आठवणींना उजाळा देताना शाळा बंद पडल्याचे शल्य प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनाला बोचत होते. शाळा सुरू व्हावी ही सर्वाचीच इच्छा होती. चर्चेअंती शाळा सुरू करण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी आणि समिती सदस्यांनी चर्चेअंती एकमताने गोखले एज्युकेशन संस्थेशी संपर्क साधला आणि शाळा पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी केली. संस्थेच्या सदस्यांकडूनही अनुकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे माजी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. केवळ आश्वासन देऊन गोखले एज्युकेशन संस्थेचे पदाधिकारी थांबले नाहीत तर त्यांनी शाळा कशी सुरू करता येईल याचा अभ्यास सुरू केला. माजी विद्यार्थ्यांचे मतही विचारात घेण्यात आले. मराठी टक्का घसरल्याने मराठी माध्यम सुरू करणे अवघड असल्याचे चर्चेतून निष्पन्न झाले. त्यामुळे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता जून २०१५ पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार असून शिशुवर्गापासून (ज्युनिअर केजी) त्याचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी सर्वतोपरीने मदत करण्याची तयारी दाखविली असून शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थी शोधण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा एक गट लवकरच कामालाही लागणार आहे.
माजी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव डीजीटी हायस्कूल पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू असून त्यासाठी आवश्यक ती सर्व जुळवाजुळव करण्यात येत आहे. मात्र आता मराठीऐवजी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही अन्य अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून परवानगी मिळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत, अशी माहिती भाऊसाबेह वर्तक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. व्ही. संत यांनी दिली. तसेच माजी विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुकही केले. आता बंद पडलेली शाळा सुरू करून कच्च्याबच्च्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन सुरू होत आहे.