गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मराठी कुमारवयीन मुला-मुलींच्या भावविश्वावर अधिराज्य गाजविणारी फास्टर फेणे ही व्यक्तिरेखा आता इंग्रजीत उपलब्ध झाली आहे. पुण्यातील तेजस मोडक यांनी फास्टर फेणे मालिकेतील ‘प्रतापगडावर फास्टर फेणे’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या जयपूर साहित्य महोत्सवात पेंग्विन कंपनीच्या वतीने या कादंबरीचे प्रकाशन झाले.सध्या मुंबईत सुरू असलेल्या काळा घोडा महोत्सवातील बालसाहित्य मेळ्यात मुलांसाठी आयोजित एका कार्यशाळेच्या निमित्ताने ‘फास्टर फेणे’च्या या इंग्रजी कथेच्या काही भागाचे अभिवाचन होणार आहे. त्याचप्रमाणे सीबस या कंपनीने ‘फास्टर फेणे’वर अ‍ॅनिमेशन मालिका बनविण्याचे हक्क घेतले असून, त्या अ‍ॅनिमेटेड फास्टर फेणेचे दर्शनही महोत्सवात होणार आहे. गुरुवार, ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत फोर्टमधील किताबखाना येथे हा कार्यक्रम होईल.   
स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजी साहित्यातील विज्ञानविषयक कथांचे मराठीत अनुवाद करणाऱ्या भा.रा. भागवत खास मुलांसाठी बालमित्र हे खास मासिक प्रसिद्ध करीत असत. त्यातूनच त्यांनी पुढे फास्टर फेणे ही खास मराठमोळी व्यक्तिरेखा रंगवली. किशोरवयीन मराठी वाचकांमध्ये ही मालिका भलतीच लोकप्रिय ठरली. त्या मालिकेतील एक कादंबरी पुणे येथील लेखक तेजस मोडक यांनी इंग्रजीत अनुवादीत केली आहे.
प्रौढ साहित्य तसेच मनोरंजन विश्वातही सध्या देशीवादाचा प्रभाव आहे. बाल गणेश, हनुमान, छोटा भीम या व्यक्तिरेखा भारतीय बाल तसेच कुमारवयीन मुलांवर जास्त प्रभाव टाकताना दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी इंग्रजी हॅरी पॉटरने जगभरातील वाचकांच्या भावविश्वावर अधिराज्य गाजविले होते. भारतातही हॅरी पॉटरचे अनेक चाहते आहेत. फास्टर फेणेच्या या नव्या अवतारामुळे इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याच्या करामती वाचता येतील. फास्टर फेणे व्यक्तिरेखेवरील मराठी दूरदर्शन मालिकाही लोकप्रिय झाली होती. नवी पिढी त्याचा अ‍ॅनिमेटेड अवतार पाहणार आहे.