मुघलकालीन आणि मराठय़ांची सुमारे एक हजार चित्रे. इतिहासातील चलनव्यवहार सांगणारी साडेतीन हजार नाणी. वेगवेगळय़ा उत्खननात आणि मध्ययुगीन काळातील जपून ठेवायची भांडी, २३५ शिल्प असा मोठा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दालनाच्या प्रतीक्षेत आहे. इतिहास विभागाने मोठय़ा मुश्कीलीने आणि वेगवेगळय़ा माध्यमांतून गोळा केलेल्या या वस्तू मांडण्यासाठी दालने बांधली जावीत, असा प्रस्ताव दिला गेला. कागदी घोडे नाचले गेले. तरतूद असूनही काही वेळा प्रयत्न तोकडे पडले. या साऱ्या ऐतिहासिक वस्तू दालनाशिवाय असल्याने त्या इतिहासाच्या अभ्यासकांना आणि सर्वसामान्यांना दिसू शकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाने १९७५ मध्ये संग्रहालयाची कल्पना मांडली. ती प्रत्यक्षात उतरविली गेली. १९८३ मध्ये संग्रहालयासाठी इमारत उभी राहिली. वेगवेगळय़ा माध्यमांतून वस्तुसंग्रहालयात येऊ लागल्या. इतिहासाच्या उलटय़ा पावलाने मानवाचा इतिहास, सत्ता, राजकारण, समाजकारण, व्यक्ती अशी कितीतरी प्रकारची माहिती विद्यापीठात उपलब्ध आहे. मुघलकालीन चित्रकला तर अप्रतिमच आहे. पारसनीस हे इतिहासाचे महत्त्वाचे अभ्यासक. त्यांनी मोडी लिपीतील १७ हजार कागदपत्रे विद्यापीठाकडे सुपूर्द केली. त्यांच्याचकडून मराठाकालीन, राजस्थानी, इंग्रज सत्ताकाळातील चित्रांचे नमुने मिळत गेले. पण हे सगळे नमुने संग्रहालयात ठेवता येत नाही. कारण दालन खूप अपुरे आहे. एक हजार चित्रांपैकी ६० चित्रे संग्रहालयात दिसतात. १११ नाणी, ४५ पैकी केवळ २ वस्त्र, ९० शस्त्रास्त्रांपैकी ४० शस्त्रास्त्रे, १५५ भांडय़ांपैकी २६ भांडी आणि २४५ शिल्पांपैकी ४० शिल्प संग्रहालयात दिसतात. उरलेला ठेवा नीटपणे सर्वसामान्यांपर्यंत जावा म्हणून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने निधी दिला. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या काळात दरवर्षी २५ लाख रुपयांची तरतूदही होत असे. पण दालन काही बांधले गेले नाही. या संग्रहात भोकरदनच्या उत्खननात सापडलेले एक दुर्मिळ हस्तदंती शिल्प आहे. केवळ एवढेच नाही तर शिळाछापावरील चित्रही विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. त्याला ‘लिथोग्राफ’ म्हणतात. वेरुळमधील १५० लिथोग्राफच्या मदतीने रंगकाम होत असे. रागरागिणींवर आधारित चित्रेही उपलब्ध आहेत.
इतिहासाचे विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे सांगत होते, ग्रीसमध्ये पॉम्पे नावाचे एक शहर होते. तेथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि एक शहरच गडप झाले. त्या शहराच्या उत्खननात सापडलेले शिल्प आणि भोकरदनमध्ये केलेल्या उत्खननातील शिल्प सारखेच आहेत. भारत आणि रोम यांचा व्यापार किती दृढ होता, याचे हे पुरावे. पण दालन नसल्याने सगळय़ा वस्तू मांडता येत नाही.
इतिहास विभागाने पुरातत्त्व अभ्यास, अजिंठा-वेरुळचा व अन्य एक अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले होते. मात्र, प्रशासकीय अडीअडचणीत ते झालेच नाही. आता या सगळय़ा प्रकल्पांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्यासाठी प्रस्तावही तयार केले जात आहे. पण प्रशासकीय अडचणी एवढय़ा गमतीच्या असतात, की त्या सोडवता सोडवत नाही. याच संग्रहालयाच्या परिसरात दोन तोफा आहेत. त्यांना लाकडी गाडय़ांवर बसविण्याचे नियोजन होते. प्रस्ताव गेला. पण पुरातत्त्वीय मांडणीतील बैलगाडी बनविणारा माणूस जरा अधिक रक्कम मागत असे. निविदेत घोडे अडले ते अडलेच. खरेतर पुरातत्त्व विभागाच्याच ठेकेदाराकडून हे काम होऊ शकले असते. तसाही प्रस्ताव दिला गेला, पण सरकारी कारभाराचा रंग लाल असतो म्हणतात, ते उगीच नाही. काम झाले नाही, ते नाहीच. आता इतिहास तर जवळ आहे, पण तो मांडता येत नाही. कारण त्याला दालनाची प्रतीक्षा आहे.