‘कोणत्या क्षेत्रात करिअर अरायचं आहे?’, ‘करिअरची निवड स्वत: केलीस की कुण्याच्या सांगण्यावरून?’ असे विविध प्रश्न विचारत शालेय व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निमित्त होते ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या मार्ग यशाच्या या परिसंवादाचे.
या परिसंवादात सहभागी होऊन करिअरविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी रवींद्र नाटय़ मंदिरात तोबा गर्दी केली होती. या परिसंवादाच्या निमित्ताने विविध शैक्षणिक संस्थांचे प्रदर्शनही या ठिकाणी भरविण्यात आले होते. आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करताना नेमक्या कोणत्या पायऱ्या आहेत, करिअर निवडीसाठी अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टची गरज आहे का? अभियांत्रिकी परीक्षेसाठी घेण्यात येत असलेली जेईईची परीक्षा बंदी व्हावी, असे असे एक ना अनेक प्रश्न मनात साठवून विद्यार्थी आणि पालक रांगेत उभे होते. इतक्यात खुद्द तावडे यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. एरवी सुरक्षारक्षकांचे कवच आणि लाल दिव्याच्या गाडीच्या बाहेर न पडणारे मंत्री आपल्याशी येऊन चर्चा करतात हे पाहून विद्यार्थी एकदम खूश झाले.
Untitled-1
शिक्षणमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असतानाच विद्यार्थ्यांनी जेईई नको, अभियांत्रिकी प्रवेश प्रकियेसाठी नकारात्मक गुणपद्धती नको यावर तुम्ही काही तरी करा, असे तावडे यांना सांगितले. तर काहींनी अभियांत्रिकी प्रवेश-प्रक्रियेबाबत तक्रारी केल्या. यावर तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या बोलण्यात तथ्य असून या दृष्टीने सरकार विचार करीत असल्याचे त्यांना सांगितले. यानंतर शैक्षणिक संस्थांच्या प्रदर्शनांना भेट देत असताना तावडे यांना विद्यार्थ्यांनी गराडा घातला व आपल्या मनातील प्रश्न विचारले. त्या वेळेसही तावडे यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले.