माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासह इतर कारणांसाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीच गर्भवती महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार निफाड तालुक्यात घडला. संशयितांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा विवाहितेच्या नातेवाईकांनी दिल्यावर काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या प्रकरणी संशयित म्हणून पती, सासू-सासऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तणावपूर्ण वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील रहिवासी धर्मनाथ जाधव यांची कन्या रोहिणी हिचा विवाह निफाड तालुक्यातील लोणवाडी येथील भास्कर चोपडे यांचा मुलगा सागर याच्याशी वर्षभरापूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवसात माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी रोहिणीचा मानसिक व शारिरीक छळ सुरू झाला. या आठवडय़ात जाधव यांनी पाच लाख रुपये देण्याचे कबूलही केले होते. मात्र याच कालावधीत ती गर्भवती असल्याचे समजले. रोहिनीने आपल्या तीन महिन्याचा गर्भ काढावा यासाठी सासरच्या लोकांकडून तिच्यावर दबाव आणला जात होता. याबाबत रोहिणीचे मामा जगन मते यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले. मात्र त्या आधीच रोहिणीने छळाला कंटाळत लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच सकाळी विष पिऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांची तक्रार आहे. रोहिणी हिला सासरच्या मंडळीनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सासरच्या सततच्या त्रासामुळे तिने आत्महत्या केली. त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला. या मागणीवर नातेवाईक ठाम राहिल्याने रोहिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी भास्कर चोपडे, अनिता चोपडे आणि सागर चोपडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
लोणवाडी येथे पार्थिवावर पोलीस संरक्षणात अंतिम संस्कार करण्यात आले.