करंजाडे नोडवर कोणाची सत्ता या वादातून येथील स्थानिक वीज कंत्राटदार किशोर बाबरे यांच्यावर हल्ला होऊन पंधरा दिवस उलटले तरीही या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारास अटक न केल्याने आरपीआयच्या वतीने एका बैठकीत आज पनवेल शहर पोलिसांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
पंधरा दिवसांपूर्वी पनवेल शहरातील मुख्य बाजारपेठेत किशोर बाबरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली तरीही या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुनील साबळे या तडीपार गुंडाला पोलिसांनी न पकडल्याने दलित समाजाच्या नेत्यांनी आज पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. सात दिवसांत साबळेला अटक न केल्यास आरपीआय नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतील, असा इशारा पोलिसांना देण्यात आला.
संतापलेल्या दलित कार्यकर्त्यांनी पनवेल पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करीत या प्रकरणातील तक्रारदार किशोर बाबरे याला साबळेचे या प्रकरणात नाव न घेण्यासाठी पोलीसच धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला. बैठकीत साबळे या गुंडाची दहशत करंजाडे गावात असून पोलीस अशा तडीपार गुंडाला पाठीशी घालत असल्याचा आरोप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी केला. यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी पोलिसांची भूमिका कायदेशीर असल्याचे सांगून किशोर बाबरे यांच्यावरील हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी सुनिल साबळे याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके काम करीत आहेत. लवकरच साबळेला अटक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना दिले.