गंगापूर रस्त्यावर घडलेली दुर्घटना ही सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारीतील नाही, कोटय़वधी रुपये खर्चुन नित्कृष्ट दर्जाच्या साकारलेल्या पावसाळी गटारीमध्ये ती घडली असून पालिकेतील काही अधिकारी ही बाब जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. रस्त्यालगत साकारलेल्या पावसाळी गटार योजनेवर सर्वत्र या पध्दतीने नित्कृष्ट रस्त्यांची कामे केली जात आहे. यामुळे सिंहस्थात संपूर्ण शहरात अशा दुर्घटना घडण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळी गटार योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करून चौकशी केली जात होती. परंतु, ही चौकशी थांबविण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करून पावसाळी गटार योजनेची पुन्हा सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
सोमेश्वर मंदिरासमोर गंगापूर रस्त्यावर गटारीत स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. ही गटार सांडपाणी वाहून नेणारी नसून पावसाचे पाणी वाहून नेणारी गटार आहे. १५ ते २० फूट खोल असणाऱ्या गटारीच्यावर गंगापूर रस्ता विस्तारीकरणासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. पावसाळी गटार योजनेचे काम सुमार दर्जाचे झाल्यामुळे ठिकठिकाणी हा रस्ता ढासळत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
या योजनेची काही वर्षांपूर्वी चौकशी सुरू होती. मध्यंतरी ती अचानक थांबविण्यात आली. ही चौकशी थांबविली नसती तर निष्पाप मजुरांचे बळी गेले नसते. सिंहस्थाच्या नावाखाली सध्या सुरू असलेल्या विविध कामांवर संबंधित विभागांचे नियंत्रण नाही. कोणत्याही नियोजनविना केवळ पैसे खर्च करण्यासाठी बेफानपणे कामे सुरू आहेत. पावसाळी गटार योजनेच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास शहराला वारंवार अशा घटनांना सामोरे जावू शकते.
पालिकेत कित्येक वर्षांपासून काही अधिकारी एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. काहीही केले तर आपले कोणी काही बिघडवू शकत नाही असा त्यांचा अविर्भाव आहे. या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे अवघे शहर वेठीस धरले गेले आहे.
बुधवारी तीन मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर पावसाळी गटार योजनेची जबाबदारी सांभाळणारा तसेच विभागीय अधिकारी घटनास्थळी गेला नाही. उलट संबंधितांकडून ही गटारीत घडलेली घटना असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न झाला. पालिकेत वर्षांनुवर्ष एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर चाललेल्या रस्त्यांची कामे नित्कृष्ट दर्जाची आहेत. विहित निकषानुसार ही कामे न करता थातुरमातुर पध्दतीने कामे केली जात आहे. यामुळे सिंहस्थासाठी उपलब्ध होणारा सर्व पैसा पाण्यात जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. गटारीतील मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करताना पालिका आयुक्त व पोलीस यंत्रणेने ही घटना नेमकी कुठे घडली याची शहानिशा करावी, याकडे त्यांनी लक्ष वेधले.