शहरातील मलेरिया व डेंग्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी आजारांविषयी जनतेच्या मनात असलेली भीती काढून टाकण्यासाठी जनजागृती मोहीम यांच्या एकत्रित अंमलबजावणीची अधिक गतिमान कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. या प्रसंगी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, आरोग्य समिती सभापती पूनम पाटील, वैद्यकीय अधिकारी दीपक परोपकारी, शहर हिवताप अधिकारी उज्ज्वला ओतुरकर, तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
डेग्युबाबत संशयित रुग्ण आणि डेंग्यूचे प्रत्यक्ष निदान झालेला रुग्ण यामध्ये फरक असल्याचे स्पष्ट करीत तपासणीमध्ये एनएस १ पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला रुग्ण म्हणजे डेंग्यूचा संशयित रुग्ण असून त्याला डेंग्यूचा रुग्ण म्हणणे योग्य ठरणार नाही, असे आरोग्य विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले. यावर महापौरांनी नागरिकांच्या मनातील डेंग्यू आजाराबाबतची भीती कमी करण्यासाठी आरोग्य विभागास तत्पर कार्यवाहीच्या सूचना बैठकीत दिल्या. खासगी दवाखान्यांतील डॉक्टर्स व तपासणी केंद्रे-लॅब यांनाही डेंग्यू मलेरियाबाबत नागरिकांना योग्य माहिती द्यावी, असे त्यांना आरोग्य विभागामार्फत सूचित करण्यात यावे असे महापौरांनी सांगितले. डास उत्पत्ती होऊ शकेल, अशा आपल्या घरातील व परिसरातील जागांबाबत नागरिकांनी जागरूकता दाखवावी व स्वत: वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य जपण्यासाठी डासउत्पत्ती स्थानके नष्ट करावीत आणि अशी स्थानके शोधण्यासाठी आपल्या घरी, सोसायटीत येणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना सूपर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.