नवी मुंबई महापौरपदाची निवडणूक निर्विवाद पार पडावी यासाठी काँग्रेसबरोबर आघाडी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार यांच्याकडे पक्षाच्या सर्व ५२ व अपक्ष पाच यांची अधिकृत नोंदणी करून घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या नोंदणीबरोबरच बुधवारी काँग्रेसचे दहा नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठिंब्याचे पत्र देणार आहेत.

नवी मुंबई पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या पाच जागा कमी पडल्याने राजकीय तिढा निर्माण झाला होता. अपक्षांना आपल्या गटात खेचण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने अनेक प्रयत्न केले होते. काँग्रेसच्या दहा नगरसेवकांचा युतीच्या या नाटय़ाला सहमती गृहीत धरून युतीच्या नेत्यांनी अपक्षांचा भाव वाढवला होता. त्यामुळे युती सत्तेसाठी प्रयत्न करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यावर उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबरोबर चर्चा करून आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्या बदल्यात उपमहापौरपद व विशेष समित्यांचे सभापतिपद देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आघाडी केल्यानंतर जीव भांडय़ात पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संदीप नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रतिबंध उपाययोजना म्हणून मंगळवारी सर्व नगरसेवकांचे प्रतिज्ञापत्र त्यांच्या उपस्थितीत कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार यांच्याकडे दाखल केले. त्यामुळे या नगरसेवकांना आता कोणत्याही स्थितीत फारकत घेता येणार नाही. एखाद्या नगरसेवकाने अशा प्रकारे पक्षविरोधी कारवाया केल्यास तो नगरसेवक अपात्र ठरविला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवक प्रतिज्ञापत्राबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सुधाकर सोनावणे, रंजना सोनावणे, अपक्ष श्रद्धा गवस, रुपाली शिंदे आणि सीमा गायकवाड यांचीही प्रतित्रापत्रे सादर करून घेण्यात आली आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झाल्यामुळे अपक्षांची किंमत कमी झाली आहे. अन्यथा हा भाव दोन कोटी आणि विविध शासकीय पदे इथपर्यंत गेला होता. त्यामुळे महापौरपदासाठी लागणारी बहुमताची मॅजिक फिगर राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याने अपक्षांना सत्ताधारी पक्षाबरोबर राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनाही चांगली पदे मिळणार आहेत. दोन दिवसांत काँग्रेस आपल्या दहा नगरसवेकांचे पाठिंबापत्राचे प्रतिज्ञापत्र कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहे. त्यामुळे काँग्रेस व अपक्षांच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसने ६७ नगरसेवकांचे बहुमत सभागृहात तयार केल्याने त्यांची पाच वर्षांचे सभागृह चालविण्याची चिंता मिटली आहे.

सोनावणे आता राष्ट्रवादी?
रबाले झोपडपट्टीतील प्रभागामधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय पुरस्कृत अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांना महापौर करण्याची गणेश नाईक यांची इच्छा आहे. नवी मुंबईचे महापौरपद अनुसूचित जातीचे जाहीर झाल्यानंतरच नाईक यांनी सोनावणे यांना हा शब्द दिला होता. तो पूर्ण करताना एक तांत्रिक व काँग्रेसच्या नगरसेवकांची अडचण येत होती. सोनावणे अपक्ष असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर ठरत नाहीत हा तांत्रिक आणि आम्ही अपक्ष नगरसेवकाला महापौर पदासाठी पाठिंबा देणार नाही ही काँग्रेसच्या नगरसेवकांची भूमिका यामुळे नाईक यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्यावर उपाय म्हणून सोनावणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य करून घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर म्हणून जाहीर होतील आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा आक्षेप दूर होईल, अशी या नोंदणी प्रकरणामध्ये नाईक यांनी काळजी घेतली आहे.