नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवार अंजली दमानिया यांची बदनामी करण्यासाठी काही तथाकथित शेतकऱ्यांकडून त्यांच्यावर निराधार आरोप करण्यात आले. मात्र, या आरोपाने आम्ही भयभीत होणार नाही. गडकरींचे गैरव्यवहार आम्ही उघडकीस आणतच राहू, असा घणाघाती वार आपच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला.
भाजपचे नेते नितीन गडकरींच्या विरोधात लढत देणाऱ्या आपच्या उमेदवार अंजली दमानिया यांच्या प्रचारासाठी जयताळा येथे मेधा पाटकर यांची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पाटकर यांनी गडकरींवर टीकेचा भडीमार केला. गडकरींच्या पूर्ती साखर कारखान्यातील व्यवहारात अनियमितता आहे. गडकरी ही बाब नाकारत असतील तरीही खरी परिस्थिती काय आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे. ते स्वत:ला स्वच्छ मनाचे समजत असतील तर ते न्यायालयीन चौकशीला सामोरे का जात नाही, असे पाटकर म्हणाल्या.
कर्जतचे काही शेतकरी आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांच्यावर जमीन विक्रीच्या संदर्भात आरोप केले. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नितीन चव्हाण यांनीही केजरीवाल यांच्यावर अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप केला. हे सर्व आरोप निराधार असल्याचेही पाटकर म्हणाल्या. याप्रसंगी आपच्या प्रवक्त्या प्राजक्ता अतुल यांनी हे सर्व मुद्दे निवडणुकीच्या एक आठवडा आधीच का आले, असा प्रश्न उपस्थित केला. आपचे जिल्हा समन्वयक देवेंद्र वानखेडे यांनीही भाजप आणि काँग्रेसवर आरोप केले.