निवडणूक प्रचारात नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिस्पर्धी कोणत्याही उमेदवारांवर वैयक्तीक स्वरूपाची टीका करू नये, आपली ध्येयधोरणे आणि केलेले कार्य व भविष्यातील योजना जनतेसमोर ठेवून प्रचाराच्या उच्च सांस्कृतिक दर्जाचा व मूल्यांचा परिचय द्यावा, असे आवाहन यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघातील कांॅग्रेस आघाडी उमेदवार सामाजिक न्यायमंत्री  शिवाजीराव मोघे आणि महायुतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांनी केले असले तरी प्रचारात बेभान झालेल्या नेत्यांनी या आवाहनालाच हरताळ फासल्याचा प्रकार सध्या जोरदार चच्रेचा विषय झाला आहे.
भाजपातून कांॅग्रेसमध्ये आलेल्या माजी खासदार आणि नुकतेच विधान परिषदेवर निवडून आलेल्या व कांॅग्रेसचे राष्ट्रीय स्टार प्रचारक हरिभाऊ राठोड यांनी निवडणूक प्रचारसभेत सांस्कृतिक मूल्यांची पार ऐशीतशी करून टाकली. आर्णी येथील प्रचारसभेत बोलतांना हरिभाऊ राठोड प्रसार माध्यमांवर इतके घसरले की, ‘निवडणूक होईपर्यंत जनतेने टी.व्ही. पाहू नये आणि वृत्तपत्रही वाचू नये. ही माध्यमे विकली गेली आहेत आणि ती दिशाभूल करीत आहेत. मतदारांमध्ये त्यामुळे कमालीचा गरसमज निर्माण होते. वृत्तपत्राचा वापर घरातील लहान मुलांची घाण साफ करण्यासाठी करा.’
राठोड यांच्या या वक्तव्याचा आर्णीच्या पत्रकारांनी तीव्र निषेध करून राठोड यांच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी करणारे निवदेन तहसीलदारांना दिले. विशेष असे की, दुसऱ्या एका जाहीर कार्यक्रमात आमदार हरिभाऊ राठोड यांनी शेतकरी आत्महत्या कर्जबाजारीपणा व नापिकी यामुळे झाल्या नाही, तर दारू किंवा व्दिभार्या व्यसनापायी झाल्याचे सांगून जनतेचा प्रचंड रोष ओढवून घेतला. येथील कोल्हे सभागृहात बंजारा समाजाच्या सभेत आणखी एका नेत्याने विशिष्ट समाजाकडे अंगुलीनिर्देश करून बदला घेण्याची वेळ आली आहे, असे विधान करून वातावरण संतप्त करून टाकले होते.
वडय़ाचे तेल वांग्यावर !
रेल्वेमंत्री मल्लीकार्जुन खारगे यांच्या कार्यक्रमात वृत्तपत्राच्या मालकाने हरिभाऊ राठोड यांना व्यासपीठावरील पहिल्या रांगेत पहिल्या खुर्चीवर बसलेल्या आमदार हरिभाउ राठोड यांना उठवून दुसऱ्या रांगेत बसविले होते. जाहीररित्या झालेल्या या अपमानामुळे हरिभाऊ राठोड यांनी त्या मालकाचा राग सर्वच प्रसार माध्यमांवर काढून ‘वडय़ाचे तेल वांग्यावर’ ही म्हण सार्थक करण्याचा असफल प्रयत्न करून स्वत टीकेचे लक्ष झाल्याची प्रतिक्रिया यांच्याच वर्तुळात व्यक्त होत आहे.